जगात जिथं कुठं युद्ध होत तिथं फक्त भाषा गोळीची असते आणि सत्ता फक्त मृत्यूची असते.
युद्ध म्हणजे हॉलिवूड मुव्ही समजणाऱ्या लोकांसाठी.
युद्ध एकट कधीच नसतंय.
राष्ट्रध्वजात लपेटलेले निष्प्राण देह,
काळीज विदीर्ण करणारा वीरपत्नीचा आक्रोश,
भवतालचा शोक पाहून कावरी बावरी झालेली चिमुकली,
हुंदके दाबून सगळ्या वेदना उरात दडपणारा पिता
अन
बोबडे बोल बोललेला पोटचा गोळा आज अबोल होऊन पडलेला पाहून सुन्न झालेली माता.
युद्ध एकट कधीच नसतंय,
जिवाभावाचा सवंगडी आज सोडून गेलाय म्हणून अश्रू ढाळणारे मित्र,
शेवटची मानवंदना देताना थरथरत बंदुकीचे चाप ओढणारे सहकाऱ्यांचे हात,
अमर रहे च्या घोषणा देणारे न आतून कोसळून पडलेल सगळं गाव.
युद्ध एकट कधीच नसतंय
सीमेवरच गाव भरल्या डोळ्यांनी सोडणारी माणसं,
खेळणी माग राहिली म्हणून रडणारी लेकरं,
किडुक मिडुक कवटाळून शाळेच्या पडवीत चूल पेटवणाऱ्या माऊल्या,
तोफेच्या गोळ्याने भाजून निघणारी जनावर
आणि उध्वस्त झालेली शिवार
करपलेल्या धानासोबत करपलेली स्वप्न.
युद्ध एकट कधीच नसतंय,
एकसारखी चित्र सीमेच्या अल्याड न पल्याड सारखीच चितारणारी नियती,
तेच आक्रोश न तेच हंबरडे एकसारखे.
युद्ध एकट कधीच नसतंय
सिनेमातल्या लढाई सारखी लढाई समजणारी उन्मादी झुंड,
मढ्याच्या टाळूवरल लोणी खाणारी गिधाड,
गेंड्याच्या कातडीची यंत्रणा,
कणा मोडलेली अर्थव्यवस्था आणि हतबल झालेला सामान्य माणूस.
युद्ध एकट कधीच नसतंय.
आनंद शितोळे
No comments:
Post a Comment