आज चार्ल्स डार्विन यांचा जन्मदिवस!
आपल्यापैकी प्रत्येकाला आपण मुळचे कोण, कुठले असा प्रश्न पडलेला असतो.या सजीवसृष्टीचे मूळ कुठे आहे, हा ही प्रश्न सतावत असतो. या प्रश्नाचा शास्त्रशुद्ध मागोवा घेण्याचे श्रेय उत्क्रांतीवादाचा जनक चार्ल्स डार्विन याच्याकडे जाते।
डार्विन
'मानवाचे अंती एक गोत्र' या पुस्तकातील उतारा--
डॉ. सुनिती धारवाडकर
उत्क्रांती समजून घेताना ---
आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे प्राणी ,पक्षी, वनस्पती आपल्या दृष्टीस पडतात. पृथ्वीवर जवळपास दहा लाख प्रकारचे सजीव आहेत. या बहुविध सृष्टीमधल्या जीवांमध्ये किती विविधता आहे; यांच्या आकार, रंग रूप,आणि वसतीस्थान यांमध्ये किती वैविध्य आहे! जमिनीवरील छोट्या मुंग्या, कीटक ते हत्ती, वाघ, सिंहासारखे भलेमोठे प्राणी ,जलाशयातील अनेक प्रकारचे मासे, आकाशात विहरणारे पक्षी ,झाडांवर उडया मारणारी माकडे आणि या सर्वांकडे स्वतः च्या दृष्टिकोनातून पहाणारा होमो सेपीयन या मानवजातीचा “सुबुद्ध मानव” !
या विविध रंगी, बहुढंगी जीवसृष्टीच्या अस्तित्वाच्या कोड्याचा उलगडा होण्यास सुरुवात झाली ती चार्ल्स डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताने! त्याने आणि आल्फ्रेड वॉलेस यांनी मांडलेल्या या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती व विकास कसा होत गेला हे शास्त्रशुद्धरीत्या उलगडून दाखवले. आल्फ्रेड वॉलेस हा सुद्धा एक ब्रिटिश निसर्गतज्ञ होता.त्यानेही स्वतंत्ररित्या उत्क्रांतीतत्व मांडले होते. त्याने या विषयी एक शोधनिबंध लिहिला आणि तो प्रसिध्द करण्यापूर्वी समीक्षा करण्याकरिता डार्विनकडे पाठवला. गंमत म्हणजे एक वर्ष आधी डार्विन सुद्धा त्याच निष्कर्षाप्रत आला होता! मग १८५८ मध्ये दोघांनी मिळून एकत्र एक शोधनिबंध लिहिला . त्यात त्यांनी ‘उत्क्रांती आणि नैसर्गिक निवड’ ( नॅचरल सिलेक्शन) याबद्दल क्रांतीकारक संकल्पना मांडली.त्यानंतर एक वर्षांनी डार्विनने जीवजातींचा उद्गमावर “ओरिजिन ऑफ स्पेसिज” हे जीवशास्त्रातील अत्यंत महत्वाचे पुस्तक लिहिले .
डार्विनच्याही आधी “प्राण्यांची उत्क्रांती होत असावी” अशी पुसटशी कल्पना प्रसिद्ध ग्रीक गणितज्ञ पायथोगोरस यांचा शिष्य झेनोफानेस याने इ.स.पूर्व ५०० मध्ये मांडली होती. त्याच्या बघण्यात माल्टा येथील खाणीमधले माश्यांचे गाडले गेलेले अवशेष - जीवाश्म - (फॉस्सील्स) आले . त्याने अनुमान बांधले की हे पूर्वी कधीकाळी अस्तित्वात असलेले प्राणी असावेत आणि आता त्यांच्यामध्ये बदल झाले आहेत.पण त्याकाळी सजीवांचे जीवाश्म तयार होत असतील आणि प्राणी बदलत बदलत इथवर आले असतील ही कल्पना कोणाच्याच पचनी पडली नाही.या संकल्पनेला पुनरुज्जीवन मिळायला एकोणिसावे शतक उजाडवे लागले!
चार्ल्स डार्विन जीवशास्त्राचा अभ्यासक तर होताच, पण त्याचबरोबर त्याला भूशास्त्राचीही आवड होती. लहानपणी छोट्या प्रयोगशाळेत प्रयोग करितानां त्याची रसायनशास्त्राशीही दोस्ती झाली होती . मुळात म्हणजे त्याच्यात संशोधक वृत्ती होती. त्याने बिगल या छोट्या जहाजातून १८३१ ते १८३६ असा सलग पाच वर्षे प्रवास केला.दक्षिण अमेरीकेतील अनेक ठिकाणे आणि गाल्यापोगस सारख्या बेटांना त्याने भेटी दिल्या. या प्रवासात त्याने तेथील विविध प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतींचा अभ्यास केला, त्यांच्या पध्दतशीर नोंदी ठेवल्या. डार्विनला गाल्यापोगस या बेटावर पशु,पक्षी आणि वनस्पती यांचा अभिनव जाती आढळल्या. त्याच्या लक्षात आले की त्याला माहीत असलेल्या जीवजाती (स्पेसिज) आणि या जीवजातींमध्ये साम्य आहे. त्याने विचार केला की जीवजातींनी स्वतः ला तिथल्या वेगळ्या पर्यावरणाशी, भौगोलिक परिस्थितीशी आणि स्थानिक खाद्यपदार्थांशी जुळवून (अनुकूलन अर्थात अडाप्टेशन ) घेतले असावे .जुळवून घेतांना त्याच्यातील बदल झाले असावेत. त्यातून नवीन जाती उत्पन्न होऊन त्या मुळजातीपासून वेगळ्या होत गेल्या असाव्यात. चार्ल्स डार्विनच्या हे ही लक्षात आले होते की सजीवांमध्ये अनेक प्रकारचे छोटे छोटे बदल लाखो वर्षांच्या प्रक्रीयेतून घडत जातात, पुढे ते साचत जाऊन त्यातूनच नाट्यपूर्ण बदल दुःगोचर होतात. हे बदल बाह्यरुपात तसेच कांही शरीर- क्रियांमध्येही घडून येतात.
सुमारे २५ वर्षे संशोधन आणि चिंतन करून डार्विनने १८५९ साली “ओरिजिन ऑफ स्पेसीज “ हा जीवजातींच्या उद्गमावरचा अभिजात ग्रंथ लिहिला. “बिगल ‘ मधून केलेल्या प्रवासातील पुराव्यांबरोबर इतर शास्त्रज्ञांबरोबरचा पत्र व्यवहारातून मिळालेले पुरावेही यात जोडलेले आहेत.
डार्विनचे हे वैज्ञानिक साहित्य आज उत्क्रांतीय जीवशास्त्राचा पाया मानले जाते .
जीवसृष्टीमध्ये वेगवेगळ्या जीवजाती कशा निर्माण झाल्या असाव्यात यांची चर्चा करताना त्याने वेगवेगळे प्राणी कसे निर्माण झाले असावेत, याबद्दलचा सजीव सृष्टीच्या विकासक्रमाचा म्हणजेच उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला.
सोप्या भाषेत सांगायचे तर “उत्क्रांती” म्हणजे सजीवांच्या गुणधर्मांमध्ये पिढ्यानपिढ्या होत जाणाऱ्या बदलांच्या विकासक्रमाचा आलेख! उत्क्रांतीच्या वाटचालीत जीवसृष्टीचा वृक्ष विस्तारत जातो ,त्याला शाखा फुटत जातात, आणि जैवविविधततेत भर पडत जाते.
या सिद्धांताने जीवसृष्टीची उत्पत्ती व तिचा विकास यावर प्रकाश टाकला.
उत्क्रांती सिद्धांताचा गोषवारा –
• सर्व सजीव एकाच पूर्वजापासून उदित झाले असावेत . वृक्षाला ज्याप्रमाणे फांद्या फुटतात , त्या पद्धतीने सजीवाचे वैविध्यही एका सामाईक वंशवृक्षातून उदित झाले असावे.
*सजीवांना जगण्यासाठी लागणाऱ्या संसाधनांसाठी सतत संघर्ष (स्ट्रगल) करावा लागतो.
* परीस्थितीशी अनुयोजन करीत जुळवून घेणारी जीवजाती (स्पेसिज) टिकते, तर अनुयोजन न करणारी जीवजाती कलांतराने नष्ट होते.
जातीचा उदगम -सजीवात झालेले जनुकीय बदल जर परिस्थीतीशी जुळवून घेणारे असतील तर त्या सजीवाची ‘नैसर्गिक निवड’ (नॅचरल सिलेक्शन ) केली जाते. कालांतराने त्यातून नवीन जीवजाती उदयास येते
१८७१ मध्ये डार्विनने मानवाची वंशावळीवर लिहिलेल्या डिसेंट ऑफ मँन या ग्रंथाबद्दल डार्विन लिहितो” माझ्या या अभ्यासाचे तात्पर्य हे आहे की मानव प्राणी हा कमी सुसंघटन असलेल्या प्राण्यापासूनच तयार झालेला आहे.तो कशाप्रकारे उदित झाला असावा त्याचे विवेचन मी या ग्रंथात केले आहे. “
यातून डार्विनची विचाराशक्ती, बुद्धिमत्ता, प्रतिभा ,समयोजकता आणि मर्मदृष्टी यांचा प्रत्यय येतो. त्याचा मृत्यू होऊन एक शतक उलटून गेले.आजपर्यंत सापडलेले जीवाश्म आणि इतर पुरावे त्याने मांडलेल्या सिद्धांताला पुष्टीच देतात. उत्क्रांती प्रकियेची संकल्पना मांडणारा ,तिचा शास्त्रीय शोध घेणारा आणि तिला सिद्धांताचा दर्जा प्राप्त करून देणारा प्रतिभावंत शास्त्रज्ञ म्हणून डार्विनचे नाव जीवशास्त्राच्या इतिहासात अजरामर झाले आहे.
मानवाचे अंती एक गोत्र
No comments:
Post a Comment