Saturday, 12 February 2022

...तिला मुक्त करा हो आता !

तमन्ना इनामदार 

...तिला मुक्त करा हो आता !

   बास ना आणखी किती ताणणार आहात तिच्या क्षमता, अस्मिता,अपेक्षा,हक्क आणि मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार ? कधी थांबणार ही तिची रस्सीखेच.शतके उलटुन गेली तरी धर्माचे, संस्कृतीचे,परंपरांचे, वंशवृद्धीचे,अपेक्षांचे,नितीनियमांचे तिच्या मस्तकी मारलेले गाठोडे तिची इच्छा असुनही फेकुन देऊ देत नाही समाज-जग बदलले, तंत्रज्ञान बदलले, प्रत्येक क्षेत्रात आधुनिकीकरणाचा बोलबाला झाला..पण हे बदल बाईला बदलायला उसंतच देत नाही.
     
व्रतवैकल्य तिने करावे, उपासतापास तिने करावे,उंबर्याच्या आतच राहावे, रात्री उशिरा बाहेर राहु-जाऊ नये,खानदानची इज्जत तिच्या वर्तनातुन दिसावी, धार्मिक सांस्कृतिक प्रतिके तिनेच जोपासावी,दुसरे सांगतील तसेच वागावे,वंशाला मुलगा द्यायलाच हवा...अनेक अलिखित सक्ती अपेक्षांच्या ओझ्यामुळे तिची घुसमट होते आहे, मोकळेपणी, मनासारखे जगणे अशक्य होतं आहे,याचा विचार कधी करणार?जगु द्या तिला मनासारखे.घेऊ द्या हो मोकळा श्वास.काही बिघडत नाही,तुमचा धर्म बुडत नाही,खानदानची इज्जत पळुन जात नाही.
       हिजाब बुरखा घालावा की नाही, मंगळसूत्र,कुंकु टिकली लावायची की नाही,नाकावर घुंघट घ्यायचा का नाही...याचे तिला स्वातंत्र्य द्या आणि मग बोला की आम्ही स्त्री वर बंधनं लादत नाही.जन्मल्या पासुन बाई म्हणुन घडवायचे,वाढवायचे, संस्कार करायचे,अगदी रितसर तिच्या मेंदुची बैठक तयार करायची, मग तिने थोडे जरी चौकटीच्या बाहेर पाऊल ठेवले की धर्माच्या दावणीला तिला टांगायचे.या कामात घरातील पुरुष आणि महिला दोघे एकमेकांना पूरक भुमिका घेतात.त्यात निघालीच एखादी बेबाक तर तिला छळ,टोमणी,हिंसा,अधिकारांची पायमल्ली, चारित्र्यावर संशय ठरलेला.वर परत म्हणायचे,समाज बदलला पाहिजे,समानता आली पाहीजे.हे दोन तोंडी ढोल बडवणे थांबवा.
     महीलांनीही आता खंबीर व्हावे.स्वत:ला रितीपरंपरेचे वाहक, संस्कृतीचे एकमेव रक्षक समजण्याचा तोरा जरा बाजूला ठेऊन मला काय हवे याचा प्रामाणिकपणे विचार करावा.स्वत:लाही या पोकळ विचारांपासून दुर ठेवावे आणि इतर महीलांकडुन ही या अपेक्षा ठेऊ नये.आता पावेतो जे झाले ते बास!

उगी कट्टरवाद्यांना, राजकारण्यांना,स़धी साधुंना तुम्हाला ढाल करुन त्यांचा अजेंडा रेटायला आयता विषय पुरवु नका.कुठवर तुमच्या बाबतीतले निर्णय दुसरे घेणार आहेत...आणि तुम्ही 'अबला मैं बेचारी' म्हणुन मागे मागे राहणार आहात हा प्रश्न स्वतःला विचारून निर्णय घ्या.वादविवादाला मुद्दे पुरवण्याचे साधन न होता,जगण्याच्या,शिक्षणाच्या,
रोजगाराच्या मुद्द्यांवर बोला आता !

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...