सावित्रीमाय
----------------------
यशवंत मनोहर
पेटत्या गगनावरच
उभी राहिली ती
आणि आजवरही फाटतच आहे
दरोडेखोरीचा माज.
मूलतत्त्वांचे हातपाय तोडून
फेकले तिने मनूच्या सरणात.
अंधाराचे मस्तवाल डोंगर
भिरकावले तिने काळ्या विवरात
आणि वणव्याची बेबंदशाही
पेटवून दिली तिने
सद्विवेकाच्या निर्णायक मशालीने.
जहराचा महापूर दुभंगत होता
तिच्या पेटत्या चालण्यापुढे.
पांगळे उषःकाल
धावायला लागले दुडुदुडु
तिचे मायबोट धरून.
ती लाथाडीत होती निर्वात
तेव्हा हादरत होते रक्त पिणारे
चिरेबंदी वाडे शोषकांचे.
तिच्यामागून येत होती वाट
तिलाच वाट विचारीत.
तिला आणले नाही चंद्रसूर्याने ,
तिनेच आणले चंद्रसूर्य
इथल्या सर्वव्यापी निष्पर्णतेत.
ती मोठीमाय
अविद्येत जळणा-या सर्वच अनाथांची.
तिने पाहिले त्या दिशांवर
मोहोरून आल्या नक्षत्रांच्या वेली.
तिच्यावर थुंकणारे अवरोध
तेव्हापासून होत आहेत निरर्थक
अधिकाधिकच
आणि ती होत आहे
दिवसेंदिवस अपरिहार्य!
ती क्रांतीच्या हातातील
पेटती अग्निध्वजा,
विझत नाहीत क्षितिजांच्या पंखाना
तिने बांधलेल्या विजा.
आता गती अनुसरते
तिच्या कडकडाटाला
आणि जिवंत व्हायचे असते ज्यांना
ते अनुसरतात तिच्या
तडफडाटाला...
****
No comments:
Post a Comment