Monday, February 07, 2022
रिपब्लिकन जनता
✍️ *मानसिक बळाची शक्ती त्यागमूर्ती माता रमाई*
लेख
February 7, 2022RepublicanjantaLeave A CommentOn
लेख संकल्पना : मंगेश म. कदम
*त्यागालाही वाटावी लाज ..असा रमाई तुझा त्याग..*
*तुझ्या त्यागानेच निर्माण झाला आम्हा लेकरांचा स्वाभिमान!*
या लेखाचा उद्देश रमाबाई यांची प्रतिमा सर्वासमोर यावी हीच आहे….
रमाबाई आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी
*रमाबाई भीमराव आंबेडकर*
(७ फेब्रुवारी, इ.स. १८९८ – २७ मे, इ.स. १९३५) या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी होत्या. आंबेडकरनुयायी त्यांना आईची उपमा देत रमाई संबोधतात.
टोपणनाव : रमाई/भागीरथी (माता रमाबाई),
रमा,रामू (बाबासाहेब रमाबाईंना प्रेमाणे ‘रामू’ म्हणत)
जन्म : फेब्रुवारी ७, इ.स. १८९८ वणंदगाव
मृत्यू : २७ मे, १९३५ (वय ३७)
राजगृह, दादर, मुंबई
वडील : भिकू धुत्रे (वलंगकर)
आई : रुक्मिणी भिकू धुत्रे (वलंगकर)
पती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अपत्ये : यशवंत आंबेडकर
*सुरूवातीचे जीवन:*
रमाईचा जन्म हा ७ फेब्रुवारी, १८९८ ला एका गरीब कुटुंबात झाला होता.
मुलगी झाल्याने अती आनंद झाला आणि कोण्या कवीला गाण्याच्या ओळी सुचल्या...
अठराशे अठयाण्णव साल
हे किती हो भाग्यवान!
रमाबाईचा जन्म झाला
वाटा साखरपान !!
भिकू रुख्मिणी हर्षात,
दंग झाले हो बारशात!
वणंद गाव हा नाचू लागला.
होऊनी बेभान!!
रमाबाईचा जन्म झाला वाटा साखरपान...
ही सुकन्या सुखाची रास!
आली हर्षाची घेऊन आस !!
गावकुसाच्या राहून बाहेर
देई मनाला जाण !
रमाबाईचा जन्म झाला
वाटा साखरपान !!
बारशाला ही जमला गाव !
भागीरथी हो ठेवलं नाव !!
मानवतेचा गिरविल धडा,
कन्या ही रूपवान !
रमाबाईचा जन्म झाला
वाटा साखरपान !!
लेक संसारी घेईल दुवा,
पतीरायाची करील सेवा !
भविष्यवाणी ज्योतिषाची,मना देई समाधान!
रमाबाईचा जन्म झाला
वाटा साखरपान!!
भिकू दामू धुत्रे यांनी ह्या बालिकेचे नाव ‘भागीरथी’ असे ठेवले,ते ‘भागी’ या नावाने साद घालीत असत. तीच भागीरथी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची लाडकी ‘रमा/रामू’ होय. त्यांचे वडील भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी यांच्यासह भागीरथी जिल्हा रत्नागिरी
ता. दापोली जवळील वणंदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत. भागीपेक्षा मोठी बहीण दापोलीला दिली होती. भागी नंतर गौरी आणि सर्वात लहान शंकर होता. भिकू धुत्रे मेहनतीचे काम करून संसार चालवीत. भागीरथीचे आई –वडील प्रंचड गरीब होते. त्यांच्याकडे पोटापुरती सुद्धा जमीन नव्हती, त्यामुळे मोलमजुरी हेच त्यांचे जगण्याचे साधन. घाम गळेपर्यंत काम करणे ही एवढीच त्यांना कला अवगत होती. आणि ह्या दाम्पत्याने अतिपरीश्रम केल्याने त्यांच्या आरोग्यावर त्या कामाचा परिणाम होत गेला. दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यंत पोहचवत असे. रुक्मिणी देखील मोलमजुरी करून घराला हातभार लावीत असे. मजुरीकाम जर मिळाले नाही की गोवऱ्या थापायच्या आणि विकायच्या. वणंदगावात मजुरी मिळत नव्हती म्हणून हे कुटुंब दापोलीला मजुरीसाठी आले. तेथेच त्यांचे धुत्रे हे आडनाव वलंगकर झाले.
भागी बालपणातच आपल्या दोन भावंडांना सांभाळून घरात आईला मदत करायची. सोबतच शेण जमा करणे, शेणाच्या गोवऱ्या थापणं यात मदत करायची. आई रुक्मिणी भागीला जीवनाचं शिक्षण देत असे,— “कामाशिवाय माणसे मरतात, काम केल्याने कुणीही मरत नसतं, आपलं काम मन लावून करावं. दुनियेत गुणांची कदर होते. असाच भिकू आणि रुक्मिणीचा संसार गाडा चालू असताना भिकूला छातीत आजार जडला. त्यास रक्ताच्या उलट्या झाल्या. कारण भिकू समुद्रापासून ते थेट मार्केटपर्यंत माशांची मोठी टोपली आपल्या डोक्यावर वाहून नेण्याचे काम करीत असे. भिकूने दुखणं अंगावर काढलं. रुक्मिणीला चिंता वाटू लागली. तिनं हाय खाल्ली. अंथरुण धरलं. एके दिवशी यातच रुक्मिणीची प्राणज्योत मालवली. आईच्या जाण्याने कोवळ्या भागीच्या मनावर आघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते. भिकू वलंगकर एकाकी पडले. तीन मुलं यांची काळजी वाटू लागली. पुढे काही दिवसातच त्यांनीही अंथरूण धरले आणि त्यातच त्यांची ही प्राणज्योत मालवली. बालपणातच ही तिन्ही बालके आई-वडिलांविना पोरकी झाली.
आता भागीरथी, तिच्या दोन बहिणी – अक्का, गौरा व लहान भाऊ शंकर हे अक्षरशः निराधार झाले. त्यांच्या डोक्यावरचे मायेचे छत्र हरवले होते. भागीरथीचे वलंगकरकाका आणि गोविंदपूरकर मामा मुंबईला राहत होते. त्याला ह्या मुलांचे हाल बघवत नव्हते अखेर त्याने या तिघा भावंडाना मुंबईला आणले मुंबईच्या भायखळा स्टेशन समोरील परिसरात ते राहत होते. ते रमा, गौरा आणि शंकर यांना मुंबईला घेऊन आले. मुबंईत भायखळ्याच्या चाळीत हे सर्व राहू लागले.
भागीरथी आता लग्नाची झाली होती. मुलगी आठ-नऊ वर्षाची झाली की ती लग्नाची झाली असे समजण्याचा तो काळ. त्यावेळच्या पद्धतीनुसार लग्नाचे वय होते.
भागीरथीचे लग्न झाले तर तिच्या कपड्यालत्त्याची सोय होईल शिवाय बहिणीच्या मुलीला अनुरूप वर दिल्याचे समाधान मिळेल ह्या विवंचनेत असताना सुभेदार रामजी सकपाळ यांची भेट झाली. सुभेदार सकपाळ हे मुळचे मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे मिलीटरीमध्ये असल्यामुळे त्यांचा वापर मिलिटरी कॅम्पातच असायचा. ते मिलिटरी शाळेचे मुख्याध्यापक होते व त्यांचा दर्जा सुभेदार हा होता. ते मुंबईला स्थायिक होण्याआधी , मध्यप्रदेश , सातारा वैगैरे ठिकाणी रहात असत. त्यांच्या एका मुलाचे आनंदरावांचे लग्न झाल्यावर ते भिमरावांसाठी (भिवासाठी) वधु शोधू लागले. सुभेदारांनी अनेक मुली पहिल्या अन त्यापैकी दोघींबद्दल अंतिम निर्णय ही घेतला होता. तेवढ्यात त्यांना भागीरथी बद्दल कळाले. तिला पाहताच माझ्या मनातली सून मला सापडली याचा त्यांना आनंद झाला. भागीरथी मितभाषी, दृढनिश्चयी होती. तिला बघताच तिची शालीनता आणि विनम्रता सुभेदारांना भावली. ती सून म्हणून त्यांनी मुक्रर केले.
भीमराव त्यावेळी नववीत शिकत होते. त्यांचं वय १५ वर्षे होतं. हे लग्न एकदम साध्या पध्दतीने झाले. भायखळ्याच्या मासळी मार्केटात बुधवार, ४ एप्रिल, १९०६ रोजी हे लग्न झालं. लग्नाचे ठिकाण हे तर अजबच म्हणायचे. मुंबईतल्या भायखळा मार्केटमधील मासळी बाजार हे ते ठिकाण. यावरून लक्षात येते की त्या दोन्हीही कुंटुंबांची परिस्थिती अतिशय दारिद्र्यात होती. दोन्ही कुटुंबांची लग्नखर्च करण्याची क्षमता नव्हती आणि म्हणून ज्या मासळी बाजाराचे काहीही भाडे द्यावे लागणार नाही आणि ऐसपैस जागा वापरता येईल असे ते ठिकाण होते. “जागतिक कीर्तीचा विद्वान, स्वतंत्र भारताचा संविधानकर्ता आणि लाखो-करोडोंचा उद्धारकर्ता त्याचे लग्न बिनभाड्याच्या मासळी बाजारात ! हे खरे तर जगातले एकमेव आश्चर्य !”
अखेर अत्यंत साधेपणाने हा विवाह उरकण्यात आला, ताशांचा कडकडाट झाला. सुभेदारांनी वऱ्हाडाला शरबताची व्यवस्था केली होती .पोरं डबल-टिबल शरबत पीत होती. आता वेळ आली एकमेकांना निरोप द्यायची. भली मोठी नऊवारी साडी सांभाळता सांभाळता इवल्याशा नवरीची त्रेधा तिरपीट उडत होती. वरात वाजत गाजत चाळीजवळ आली. चाळीतल्या स्त्री -पुरुषांचे डोळे लागले होते भिवाच्या पत्नीचे रुपडे बघण्यासाठी. मुलीचे नाव काय ठेवायचे? सुभेदारांनी भिवाला विचारले. भिवाने ‘तुम्हीच काय ते नाव ठेवा ‘ असे म्हणताच सुभेदारांनी ‘रमा’ असे नाव ठेवले .
अशी लाजून बावरी झाली गं
रमा भिमाची नवरी झाली गं
वणंदकराची लाडाची लेक, दिसायला देखणी लाखात एक
सरळ स्वभावी अशी ती नेक, भीमाला शोभे पत्नी सुरेख
जणू चांदणी भूवरी आली गं, रमा भिमाची नवरी झाली गं
भीमाला पाहून लाजायची, चांदाला चांदणी साजायची
कधीच नाही रुसायची,
सदैव सुखाने हसायची
भीमरायाच्या छायेत न्हाली गं, रमा भिमाची नवरी झाली गं
चिमुकलीच्या शिरावर संसाराचा आला भार,
केली कधीना कुरकुर,
संभाळीले प्रेमाने घर
तिने किमया ही न्यारीच केली गं, रमा भिमाची नवरी झाली गं
भिमाची ती कस्तुरी
जणू मृगाची कस्तुरी
अमन टिळा अंबरी,
दरवळे गंध घरोघरी
असा त्यागाचा शृंगार ल्याली गं,
रमा भिमाची नवरी झाली गं
भागीच्या नवीन घरात सुभेदार, थोरले दीर आनंदराव व त्यांची पत्नी लक्ष्मी, भीमरावांची सावत्र आई जिजाबाई, सुभेदारांची बहीण मीरा आत्या रहात असे.
इवलीशी भागीरथी आता रमाबाई बनून संसारात गर्क झाली. डबक चाळ सर्वार्थाने अपुरी होती. भिवाचा आता भीमराव झाला होता. अशा प्रकारे त्यांच्या प्रपंचाची सुरुवात झाली. रमा सासरच्या सगळ्यांची आवडती बनली होती. वर्षभराने भीमराव मॅट्रिकच्या परीक्षेत पास झाले, त्यांचा सत्काराचे रमाला कौतुक वाटले. केळुसकर गुरूजींनी सत्कारात भीमराव यांना गौतमबुद्धांचं स्वलिखित चरित्र भेट दिले. घरात आनंदी वातावरण झाले. भीमरावांनी रमाला शिक्षणाचे महत्व पटवून देत शिकवलं, शिक्षणाचे महत्व जीवनात किती असते हे बाबासाहेबांना माहीतच होते, शिक्षणाला पर्याय नाही म्हणूनच बाबासाहेबांनी रमाईंना शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले आणि रमाई देखील संसारातून वेळ काढून शिकू लागल्या. याबाबत कवी दामोदर लिहीतात :
इच्छापूर्ती झाली मनाची आली नामी घडी,
रमाई शिकली बाराखडी!
रमाने माझ्या साक्षर व्हावे बाबांची कामना,
क ख ग घ शिकू लागली गोडी लागली मना !!
सावित्रीचा वसा घेतला, टाकून सतरा नडी,
रमाई शिकली बाराखडी...
शिक्षण आहे तिसरा डोळा अशी प्रचिती आली!
भीमराया गुरू जाहले शिष्या रमाई झाली!!
जीर्ण मताची दुरु फेकली जीर्ण रूढी घोगडी,
रमाई शिकली बाराखडी...
बाराखडीचे गिरविता हो एक एक अक्षर !
रमा लाजाळू धीट जाहली होताची साक्षर !!
ध्यानी आली अंधश्रद्धेची रिकामी ती पोतडी,
रमाई शिकली बाराखडी...
पती सारखा जडला रमाला, जनसेवेचा छंद !
ही नवलाई पाहून सारी
झाला किती आनंद !!
दामोदरात्या उंच यशाची अशी गाठली शिडी,
रमाई शिकली बाराखडी...
जसं सावित्रीबाईंना ज्योतिराव फुलेंनी शिकवलं तसं रमा आता लिहायला, वाचायला शिकली. रमाई बुद्धचरित्र याचे वाचन करीत असे, त्याचे श्रवण सुभेदार रामजी लक्षपूर्वक करत. साहेब रमाला आणि रमाने साहेबांना पत्र वाचून उत्तरे पाठविली आहेत. रमा आणि साहेब यांचं एकमेकांवर अतूट प्रेम होते, हे पत्रावरून सहज लक्षात येते.
या आनंदातच दिवस जात होते. १२ डिसेंबर, १९१२ ला रमाई–भिमराव यांना पहिला पुत्र झाला. ज्याचे नाव महात्मा फुले यांचा दत्तकपुत्र यशवंतचा वारसा म्हणून यशवंत ठेवले. यशवंताच्या जन्माने रमाला आपले जीवन सफल झाले असे वाटत होते. कारण यशवंताने रमाईला आईपण दिले होते. भीमरावही आनंदी होते.
घरातील हा आनंद अडीच महिन्याने अचानक कमी झाला. २ फेब्रुवारी, १९१३ रोजी सुभेदार रामजी यांचे निधन झाले. रमाला खूप दुःख झालं. मोठा धक्काच बसला रमाईने आपल्या आई -वडिलांचा मृत्यू पहिला आणि आता सासऱ्यांचा मृत्यू पाहत होती. रमाबाईवर जसे काही डोंगरच कोसळले. भीमरावांनीही हंबरडा फोडला. माता रमाई यांना भविष्यकालीन जीवनात फारच दुःख सहन करावे लागले.
अशातच भीमरावांची सावत्र आई जिजाबाई यांचे निधन झाले. काही दिवसांनी भीमराव- रमाईला एक मुलगी होते, जिचे नाव इंदू ठेवलं जातं. ती फारच नाजूक होती. रमाईवर गरोदरपणात अतिश्रम, झालेली उपासमार याचा परिणाम होतो. तसेच बाळंतपणानंतरही होणारे हाल यामुळे दीड वर्षातच इंदूचे निधन होते. यामुळे रमाई फार दुःखी होतात. अशातच काही दिवसांनी मोठे दिर आनंदराव यांचा मृत्यू होतो. रमाईला पुन्हा एक मोठा हादरा बसतो. एकापाठोपाठ या दुःखद घटना घडतात.
रमाईंनी पतीच्या कष्टमय जीवनात प्रामाणिकपणे साथ दिली. त्यांच्या अंगीकृत कार्यात त्यांच्यामागे सावली सारख्या सतत खंबीरपणे उभ्या राहिल्या. मृत्युसत्र, दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई. रमाईने अनेक मरणे पाहिली. प्रत्येक मरणाने तीही थोडी थोडी मेली.
मरण म्हणजे काय कळत नव्हते त्या वयात आई वडिलांचा मृत्यू. इ.स. १९१३ साली रामजी सुभेदारांचा मृत्यू. इ.स. १९१४ ते १९१७ साली बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृ्त्यू. ऑगस्ट १९१७ मध्ये बाबांची सावत्र आई जिजाबाईचा मृत्यू. पाठोपाठ मुलगी इंदू, बाबांसाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू.
दिवसामागून दिवस जात होते. आर्थिक अडचण जाणवत होती. संसारगाडा चालविणे जिकरीचे झाले होते. १९१३ ते १९१७ हा फार कठीण काळ होता, या चार वर्षांत रमाचे खूप हाल झाले. तिला सरपणासाठी वणवण फिरावं लागत होतं. तशाही परिस्थितीत रमाईने काटकसर करून बाबासाहेबांना पुस्तकासाठी मदत केली.
ज्यातून रमाई मार्ग काढत होत्या. उच्च शिक्षणासाठी भीमराव अमेरिकेला गेले होते. भीमराव अमेरिकेला पोहोचल्याचे पत्र रमाईला पाठविले. उत्तरादाखल रमाई लिहितात....
“मु.पोयबावडी
आ.साहेबांच्या चरणी
रमाबाईचा दंडवत,”
तुमचं खुशालीचं पत्र मिळालं. मजकूर समजला. आनंद वाटला. तुमि नी मामंजिनी मजला बळेबळे र ट फ करायला शिकवलंत ते आता कारणी आलं. त्यावेळी मला त्येची अप्रुपबाई वाटलं नाही. आता शिकण्याचं मोल मला उमगलंय. येडवाकडं का असेना, पर माझ्या मनातलं त्या पत्रातून तुमास्नी मला लिहिता येऊ लागलंय. ह्यो थोडा थोडका का फायदा हाय?
साहेब का न कळे, तुमी गेल्यापासनं मामंजिनं दिलेली अंकलिपी मी रोज वाचीत हुती बगा. तुम्ही मला माझ्या अक्षरात पत्र लिहायला लावणार हुता की काय, कुणास ठाऊक?
साहेब, सांगायला मला लाज वाटते, पण सांगतेय, साहेब आमालाबी तुमची भारी आठव येतेया बगा. तुमा बिगार योक योक दिस काढायचा म्हंजी लई अवघड जातया बगा,पर पुढच्या उद्याच्या सुखाकडं बगून, आजचं दुख गिळाया हावं घुसळल्याबिगार लोणी न्हायी, कष्टाबिगार फळ न्हायी, तरी तब्बेत संभाळून वाचन करा, चांगलं चुंगलं करून घालायला मी तिथं न्हायी याच वाईट वाटतंय.
साहेब, तुमाला मी बोंबलाची चटणी पारसलनं पाठवू का? पर कटाची आमटी कशी पाठवावी, पाठवली बी असती, पर तुमाला पोचू परसंत उतराण जाईल.
साहेब, तुमच्या पत्रात मला तुमि ‘परीस’ म्हनतयसा पर ते खरं न्हायी हं. खर तर तुमी परीस आहात मी काय अडाणी लोखंड पण तुमामुळं माझ्या जलमाचं सोनं हुनार. मला अभिमान हाय. मि निस अडाणी दगड असलं तरी, माझा धनी साऱ्या जगात लई शिकलेला कोहिनूर हिरा हाय म्हणून मला त्यात सारं काही मिळतंय बगा. तुमि नी मी काय दोन हाऊत व्हय.
साहेब,आनंदराव अण्णासाबच्या पगारावर व माझ्या इतर काम धंद्यावर घर चालावं तसं चाललंया. इकडची काय बी काळजी करायची न्हायी बगा. तुमी आपलं कॉलेज भलं आणि आपला अभ्यास भला. यशवंतची तब्बेत आता बरी हाय. त्येची काळजी करू नगा. यशवंतला थोरल्या दादासाहेबांचा फार लळा हाय. ते आलं की यशवंतला खूप खाऊ आणतात. खेळणी बी आणतात.आपले लोक बी त्याले खांद्यावरनं खाली उतरत न्हाईत लई लाड करत्यात. त्यानं तो खुप लाडवलाय. पण मी एक सांगू ? सांगतेच, लष्कर शिस्तीच्या मामंजींची सून मी हाय म्हटलं. त्याला लाडानं योडा न्हाय होऊ देणार. लक्ष्मीबाई, शंकर, गौरा, मुकुंद आमी सारी इकडं खुशाल ठीक.
आपली,
रमाबाई आंबेडकर
भीमरावांनी अमेरिका आणि लंडनमधील अनेक पदव्या घेतल्या. रमाबाईंना त्या पदव्यांचे महत्व वाटायचे. त्याच वेळी झालेला दुसरा मुलगा रमेश हा मरण पावला. रमाईला प्रचंड दुःख झाले. रमाबाईंना पतिसुख मिळत होते, परंतु मुलांचे सुख काही मिळत नव्हते. गंगाधर, रमेश यांचे निधन झाले होते. रमाबाई आपल्या मुलांच्या मृत्यूबद्दल भीमरावांना तात्काळ कळवीत नसत. मुलांच्या मृत्यूचे कळाले तर साहेब अर्ध्यावर अभ्यास सोडतील. मुलांचे दुःख पचवायला रमाबाई समर्थ होत्या. परंतु पतीला तर सांगणे भागच होते. यातून सावरून रमाने पत्र पाठवून साहेबांना ही बाब कळवली. बाबासाहेब ऑगस्ट १९१७ ला भारतात परत आले. रमाला फार बरं वाटलं.
१९१८ साली भीमराव सीडनेहॅम कॅालेजात प्राध्यापकाच्या जागेवर रुजू झाले. भीमरावांना पहिला पगार रु. ४५० /– मिळाला घरी आल्यावर भीमरावांनी पगाराची रक्कम रमाईच्या हातात दिली आणि म्हणाले ‘रामू ! मोज हा किती पगार आहे. रमाईंच्या डोळ्यात अश्रू तराळले. रमाई ने तो पगार सुभेदारांच्या फोटो समोर ठेवला आणि बोलल्या 'घ्या आपल्या मुलाचा पगार.' त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. भीमराव म्हणाले “अगं रामू ! पगार तरी मोज किती आहे.” रमाई म्हणाल्या , ‘ मला वेडीला एवढा पगार कसा मोजता येणार? आणि रमाबाई जमिनीवर बसल्या. पगाराच्या नोटा काढून त्याच्या चारशे पन्नास रुपयाच्या वीस प्रमाणे पुड्या केलेल्या पाहून रमाई एकदम हबकल्या ‘ बाय बाय बाय ‘ एवढा पगार आहे, रमाबाईंचा कंठ दाटला भीमराव रमाबाईंच्या सालस चेहऱ्याकडे पाहत राहिले .
जुलै १९२० ला भीमराव लंडनला जातात. त्या दरम्यान रमाईला मुलगा होतो, ज्याचे नाव गंगाधर ठेवले जाते. तो आजारी पडतो. त्याच्या दवाखान्यासाठी, औषधीसाठी रमाईकडे पैसे नसतात, अन् बाबासाहेबही आर्थिक अडचणीमुळे तिकडून पुरेसे पैसे पाठवू शकत नसतात. काही स्थानिक कार्यकर्ते आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करतात, ती मदत रमाई घेत नाहीत. इ.स. १९२१ मध्ये बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधरचे निधन होते. बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांना कळविले नाही. ही बातमी नंतर पत्र पाठवून रमाई साहेबांना कळवितात. त्यावेळी भीमराव प्रचंड हळहळतात. त्यांना आपल्या गैरहजेरीचे खूप दुःख वाटते.
परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दु:खाची झळ पोहचू दिली नाही.
पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकट्या पडल्या.. घर चालवण्यासाठी तिने शेण गोवर्या.. सरपणासाठी वणवण फिरल्या. पोयबावाडीतून दादर माहीम पर्यंत जात असत. बॅरिस्टराची पत्नी शेण वेचते म्हणून लोक नावे ठेवतील म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री ८.०० नंतर गोवर्या थापायला वरळीला जात असत. मुलांसाठी उपास करत असत.
एप्रिल १९२३ ला भीमराव लंडनहून बॅरिस्टर होऊन भारतात परत येणार होते, डॉ बाबासाहेब आंबेडकर परदेशातून येत असल्याची तार प्राप्त होताच रमाईंना खूप आनंद झाला आणि या ओळी नक्कीच गुणगुणल्या असतील.
मन गहिवरलं, खुलून बहरलं, पतूर (पत्र) आलया आज,
येणार बाई बॅरिष्टर साहेब माझं !
गुणीगुणांचा राजा दिनांचा थाटण्या संसार साज,
येणार बाई बॅरिष्टर साहेब माझं!!
गोड गोड कानी पडली सुमधुर वाणी,
धन्य झाले मी ऐकून सारं त्या राजाची राणी,
साकार झालं फळाला आलं सपान वैभव साज,येणार बाई बॅरिष्टर साहेब माझं!!!
डॉ.बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला आले असता, त्यांच्या स्वागताला सर्व आंबेडकरी समाज मुंबई बंदरात आला. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी अनेक कार्यकर्ते यांची वर्दळ होती. रमाईला ही जावे वाटत होतं, पण स्वागताला आपण नीट दिसावं, कारण बॅरिस्टर यांची बायको म्हणून आपली ओळख. नेसण्यासाठी एकच साडी होती, ती दोन जोड असलेली,फाटकी होती. पर्याय म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना सत्कारात दिलेला ‘भरजरीचा फेटा’, रमाईंनी ‘साडी’ सारखा नेसून स्वागताला गेल्या. ते बोटीतून उतरताच त्यांच्या जयजयकाराने बंदर दुमदुमून गेले. अनेकजण त्यांना भेटत होते, हस्तांदोलन करीत होते. पण रमाई मात्र लांब कोपऱ्यात उभी होती. डॉ. बाबासाहेबांची नजर त्यांच्या रामूवर गेली. ते जवळ गेले. त्यांनी विचारले, *रामू तू लांब का उभी राहीलीस?* रमाई म्हणाली, *तुम्हाला भेटण्यासाठी सारा समाज आतूर झाला असताना मी तुम्हाला अगोदर भेटणे योग्य नाही. मी तर तुमची पत्नीच आहे. मी तुम्हांस कधीही भेटू शकते.*
यासाठी कवी म्हणतात
गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची भीमाला तरी साथ होती!
पुरेसे नव्हते वस्त्र,पुरेसे नव्हते अन्न,तरीही नाही झाली मनाने दुःखी खिन्न,नाही उसंत,करी ना खंत भीमरायासाठी!!
करी कष्टकाम,गाळूनिया घाम हासऱ्या मुखाने सदा रहात होती!!!
ही गोष्ट साहेबांच्या लक्षात येते. कालांतराने आर्थिक परिस्थिती बरी होते.
अशिक्षित असलेल्या रमाईंना जेव्हा बाबासाहेबांच्या उच्च शिक्षणाबद्दल विचारले जायचे तेव्हा रमाई त्यांना असंच काही म्हणत असतील.
अशिक्षित जरूर मी
लेखू नका मज कमी,
परिचय स्वतःचा देते परिचय स्वतःचा,
माझं नाव आहे रमाई धनी पिता भारताचा!!
पती व्रतेचा दाखला माझा,
या जन्मीचा सोबती राजा,
धनी मला साजतो,
दाही दिशा गाजतो,
डंका तो कीर्तीचा त्याच्या डंका तो कीर्तीचा,
माझं नाव आहे रमाई धनी पिता भारताचा!!
या देशाचा नेक हा नेता, बौद्धजनांचा जीवनदाता,
पिडीत आज या मानवा,
ज्ञानाचा देवून दिवा,
मार्ग नवहिताचा,
माझं नाव आहे रमाई धनी पिता भारताचा!!
या पोलादी झुंझाराची,
आहे मी पत्नी धुरंधराची,
ना कोणी या सारखा
जनहिताचा म्होरका,
सारथी रथाचा,
माझं नाव आहे रमाई धनी पिता भारताचा!!
*कष्टमय जीवन:-*
इ.स. १९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले होते, त्यावेळी रमाईची खूप वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले नाहीत. त्यांनी काही पैसे जमा केले व ते पैसै रमाईला देऊ केले. तिने त्यांच्या भावनांचा आदर केला, पण ते पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्नी जिद्दीने दुःखांशी, अडचणींशी व गरिबीशी भांडत होती.
“१९२३ पासून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वकीलीचा व्यवसाय सुरु केला. रमाईला असे वाटू लागले की, आपले पती संसाराला लागले. हे पाहून स्वाध्वी रमाईला आनंद होणे स्वाभाविकच आहे. एकदा वकिलीची फी म्हणून डाॅ. बाबासाहेबांना ३०० रुपये मिळाले. तेव्हा ते सर्व त्यांनी रुमालात बांधून घरी जावून आपल्या पत्नीच्या स्वाधीन केले. इतके रुपये पाहून रमाईचा आनंद गगनात मावेना कारण; इतके रुपये त्या मातेने जीवनात कधी पाहिले नव्हते. प्रत्येक स्त्रीला वाटते की, आपल्या पतीने संसाराकडे लक्ष द्यावे. यावरुन त्या बाबासाहेबांना बोलत असत.
एकदा त्या खूप चिडल्या, बाबासाहेब म्हणाले “माझ्या नावाने सारखी ओरडत असतेस. मग मी काय करावे असे तुला वाटते..? त्यावर रमाई उदगारल्या; *”अहो घरात भाजीपाला, तेल, मीठ, गहू, तांदूळ वगैरे लागतात. याकडे तरी कधी तुम्ही थोडे लक्ष द्यावे, कधी मुलाबाळांना जवळ घ्यावे, त्यांना गोंजारावे, बायकोशी दोन शब्द प्रेमाने बोलावे, परंतु तुमचे मात्र सर्वच मुलखावेगळे, येऊन- जाऊन तुमची ती जाडजूड पुस्तके, त्यात सतत वाचन आणि तुम्ही !”*
रमाईच्या डोळ्यात अश्रू होते, त्यांनी अनेक दिवसांची मनोव्यथा आपल्या पतीसमोर व्यक्त केली, तेव्हा खऱ्या परिस्थितीची जाणीव बाबासाहेबांना देखील झाली. आणि त्या महामानवाचे डोळे पाणावले आणि ते रमाईला म्हणाले, “रामू… तू अशी साध्वी आहेस ना म्हणूनच मी असा राहू शकतो." रमाईनी आपल्या संसाराविषयक भ्रामक स्वप्नांचे मोहपाश झुगारुन दिले, तात्काळ त्या स्वाभिमानानेउद्गारल्या, “साहेब आपणांस आपल्या कोट्यवधी अश्पृश्य बांधवाच्या, समाजाच्या कल्याणाचा संसार करावयाचा आहे.” रमाईचे हे उद्गार ऐकून बाबासाहेबांच्या उत्साहास पुन्हा जागृती आली. कर्तृत्वाला चालना मिळाली. ध्येयस्थानाची नवीन स्फुर्ती मिळाली. म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर माता रमाईनां आपले स्फुर्तीस्थान मानतात.
दोन मुले व मुलगी तडकाफडकी गेल्यानंतर अपत्य प्रेमास आसुलेल्या रमाबाईंना १९२६ मध्ये पुत्र झाला. राणीसारख्या इंदूची आठवण त्यांना सतावत होतीच म्हणून ह्या मुलाचे नाव राजरत्न असे ठेवले. राजरत्नाचा चेहरामोहरा भीमरावांसारखाच होता. तो भीमरावांचा खूपच लाडका होता. त्याला डबल न्यूमोनिया झाला होता. त्याचे योग्य ते पालनपोषण झाले पाहिजे व त्याला वेळेवर औषधोपचार मिळाले पाहिजेत या उद्देशाने एखादी नर्स मिळते का ? म्हणून भीमरावांनी शोध घेतला. परंतु अस्पृश्याच्या घरी नर्स बनून काम करायला एकही तयार नव्हती, रमाबाई तर प्रचंड अशक्त होत्या. भीमराव काही चोवीस तास बाळाबरोबर राहू शकत नव्हते. अखेर १९ जुलै, १९२६ या दिवशी मृत्यूने राजरत्नवर घाला घातला . रमाबाईनी साहेबांकडे नजर टाकली. साहेब रडत होते. त्यांनी साहेबांना मिठी मारली. त्या साहेबांच्या गळ्यात पडून जोरजोरात रडू लागल्या. रमाई- भीमराव यामुळे खूपच खचतात. त्यांना सतत राजरत्नची आठवण येत असे…….
भविष्यातील तुमचा आणि माझा संसार सुखी व्हावा, आमची मुले औषधी उपचार मिळून जिवंत राहावी यासाठी भीमराव-रमाईची रमेश, इंदू, गंगाधर आणि राजरत्न ही चार मुले योग्य औषधपचार न मिळाल्याने, पोटाला अन्न न मिळाल्याने गेली आहेत. रमाईच्या झालेल्या उपासमार आणि प्रचंड श्रम यामुळे गेले आहेत, ही आठवण व जाणीव आम्हाला असावी!
अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले बाबासाहेब आता समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व त्यासाठी निष्णात डॉक्टर होण्यासाठी अपार कष्ट घेऊ लागले. अर्धपोटी उपाशी राहून १८-१८ तास अभ्यास करु लागले. त्याच वेळी रमाईने आपल्या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली.
*आईसारखी बाबासाहेबांची चिंता ...*
१९२७ साल उजाडले आणि बाबासाहेबांनी सामाजिक कार्य जोमाने सुरू केले होते. रायगड जिल्ह्यात महाडच्या चवदार तळ्यावर सत्याग्रह करण्याचे ठरले होते. डॉक्टर साहेबांनी परेलच्या दामोदर हॉल येथे आपले ऑफिस सुरू केले होते. एक दिवस घरी आल्यावर रमाई म्हणाल्या, ‘साहेब ! आम्ही बी महाडला येतो. मी आणि जाऊबाई यांच्या बरोबर बाकीच्या महिला ही येणार आहेत. त्यावर साहेब म्हणतात, “रामू ! तुम्ही येऊन काय करणार ?” रमाई म्हणते, ‘साहेब ! आपली माणसं येणार आहेत. त्यांना चहा पाणी देऊ, जेवण बनवायला मदत करू. तुमच्या जेवणाची व्यवस्था करू !’ साहेब म्हणतात, “रमा ! हजारो लोक येणार आहेत. त्यांची तुला व्यवस्था करावी लागणार आहे.” रमाई म्हणते, ‘आम्ही होईल तेवढी मेहनत करू.’ रमाईने व लक्ष्मीबाईने आपले कपडे बॅगा भरून ठेवलेल्या होत्या. परंतु रायगडचे आणि मुंबईचे कार्यकर्ते साहेबांना दामोदर हॉलवरूनच घेऊन गेले. त्यामुळे रमाई व लक्ष्मीबाई खूप नाराज झाल्या होत्या. साहेब सत्याग्रह करणार होते, म्हणजे तिथे हिंदू लोक झगडा करतील म्हणून रमाई चिंतेत होती. देवासमोर बसून पूजा पाठ करीत आपला पती सुखरुप यावा अशी देवाकडे आळवणी करीत होती. जेव्हा शंकर महाड वरून आला, त्याने रमाईला सांगितले, ‘काही झाले नाही.’ तेव्हा रमाईने जेवण केले. शंकर सांगत होता, “ताई ! साहेब सभेत म्हणाले की, 'या चवदार तळ्याचे पाणी पिऊन आम्ही अमर होणार नाही किंवा या तळ्याचे पाणी प्यायलो नाही म्हणून आम्ही मेलो नाही. परंतु इतरांप्रमाणे आम्ही माणसे आहोत. आमच्या स्पर्शाने तळ्याचे पाणी काळे निळे किंवा विषारी होणार नाही, हे दाखवून देण्यासाठी आम्ही हा सत्याग्रह घडवित आहोत. चवदार तळे सर्वांसाठी खुले आहे असा ठराव महापालिकेने केला होता. परंतु चार वर्षे आम्हाला पाण्याला स्पर्श करू दिला नाही. आज आपण त्या पाण्याला स्पर्श करणार आहोत. आज आपण चवदार तळे जिंकू.' ताई ! अगं आपल्या लोकांनी साहेबांच्या भोवती छातीचा कोट केला होता. त्यावेळी साहेबांनी, त्या चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श केला. ते पाणी आपल्या ओंजळीत घेऊन ते घटाघटा प्यायले आणि ताई, त्यावेळी आपल्या लोकांनी मोठ्या जोरात अगदी गगनाला भिडतील अशा घोषणा दिल्या, महाड सत्याग्रह की जय, हर हर महादेव, डॉ. आंबेडकर कोण आहे, दलितांचा राजा आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, या जयघोषांनी सारे महाड गांव दणाणून गेले होते. अगं ताई, साहेब आपल्या साऱ्या समाजाच्यावतीने आपल्यावर होणा-या अन्यायाविरुद्ध एक सेनापती म्हणून लढत होते. तू एवढी हाय खाऊन कशाला बसतेस ? तू शूरवीराची धरम पत्नी आहेस.” हे ऐकल्यावर रमाईच्या जीवात जीव आला आणि मगच ती आनंदाने जेवली. अशा हळव्या मनाची रमाई होती. ती एखाद्या आईसारखी बाबासाहेबांची चिंता करीत असे. साहेब जेवल्याशिवाय जेवत नव्हती. साहेबांची वाट पहात बसायची.
१९३० च्या सुमारास रमाईला सतत अतोनात कष्ट झाल्यामुळे टी.बी.या आजाराने घेरले होते. रमाईची आई, वडील, सासरे, सासू, दिर, चार मुले यांचे मृत्यू यामुळे रमाई खचल्या होत्या. तरीही जिद्दीने साहेबांना साथ देत होत्याच.
१९३० ला साहेब पहिल्या गोलमेज परिषदेसाठी लंडनला गेले. त्यावेळी रमाईची प्रकृती बरी नव्हती, कुटुंबातील कोणीच सोबत नाही, अशावेळी सुद्धा रमाई साहेबांना अडवीत नाहीत.
दुसऱ्या राउंड टेबल कॅान्फरन्स वरून १९३० ला भीमराव भारतात परतणार होते. साहेब बोटीवरून खाली आले अनेकांनी आणलेले पुष्पहार बाबासाहेब स्वीकारीत होते. भीमराव आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणांनी मिरवणूक निघाली. सगळ्यात शेवटी रमाबाईंनी हार देतांना बाबासाहेबांचा चेहरा न्याहाळन्याऐवजी त्यांची नजर साहेबांच्या पायावर होती. त्यांना ह्याबाबत प्रश्न केल्यावर त्यांनी उत्तर दिले की, 'मी साहेबांना नेहमीच पाहते. ज्यांना कधी काळी त्यांचे दर्शन होते त्यांना प्रथम संधी देणे हे माझे कर्तव्य आहे. त्यांनी गोरगरीबांच्या उद्धाराचं कंकण बांधलं आहे व मी त्यांची पत्नी आहे. त्या कंकणाला माझी नजर लागू नये म्हणून मी त्यांच्या पायाकडे नजर वळविली.'
ज्याप्रमाणे चांगले कपडे आपले व्यक्तिमत्त्व प्रकाशित करतात, त्याच प्रमाणे चांगले शिक्षण आपले व्यक्तीमत्व दुसऱ्यास प्रभावित करत असते, बाबासाहेबांना या दोन्ही गोष्टींचा छंदच होता. बाबासाहेब नेहमी सुटाबुटात असत तेव्हा ओळखीचे लोक रमाईंना कौतुकाने म्हणत..
*रमा गं रमा, तुझ्या धन्याने,घातला सूट बूट टाय,*
*तू गं शोभून दिसतेया, साहेबाला साहेबीन बाय*
समाजाच्या उन्नतीसाठी बाबासाहेब रात्रंदिवस बाहेर असत अशा वेळी रमाई डोळे पुसत त्यांची काळजीने वाट पहात, अशा सतत काळजीत असणाऱ्या रमाईना बाबासाहेब म्हणतात..
नको रमा तू माझी वाट पाहू,
तुला किती किती समजावू,
नको चिंता जीवाला तू लावू, तुला किती किती समजावू!!
उसळलेल्या सागरामधुनी चालली माझी नाव,
वादळ वाऱ्यात राहणारा
मला कुणाचं भ्याव,
संकटास पळवून लावू,
तुला किती किती समजावू!!
समाजासाठी वेळ दिला मी कार्यकरीत दिन रात,
संसाराची धुरा तुझ्यावर,
तुझी मला हवी साथ,
असा जीव जीवाला लावू,
तुला किती किती समजावू!!
लढा हा माझा अविरत चाले, नाही ग त्याला अंत,
आहे गं आपुली सत्याची बाजू, होऊ आपण यशवंत,
पूस डोळे रडत नको राहू,
तुला किती किती समजावू!!
*बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणी:-*
रमाईंनी अठ्ठावीस वर्षे बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या राजगृहाच्या प्रवेशद्वारावर तासनतास बसून राहायच्या. बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावर त्यांच्याशी तितक्याच अदबीने वागत, “साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत, नंतर भेटा.” असे म्हणत. आलेल्याची रवानगी करताना त्याचे नाव, गाव, कामाचे स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात, हे सारे एका नोंदवहीत टिपण्यास सांगत.
*रमाई धारवाडला रवाना :*
*रमाबाई ते रमाआई*
महाडच्या प्रसंगानंतर रमाबाईंना असे वाटू लागले की, साहेबांच्या जीवाला धोका आहे. आणि ह्याचा धक्का त्यांना बसला व रमाईने अंथरूण धरले. रमाईची प्रकृती आता खालावत चालली होती. मुंबईची हवा त्यांना काही मानवेना.
बाबासाहेब आणि रमाई दादरच्या राजगृह बंगल्यावर राहत होते.
१९३० - सायमन कमिशनच्या शिफारशी वरुन भारताची घटना लिहिण्यासाठी इंग्रजांनी लंडनमध्ये गोलमेज परिषद घेण्याचे ठरविले होते. साहेब, इंग्रज सरकारच्या निमंत्रणावरुन ४ ऑक्टोबर, १९३० ला लंडनला चालले होते. तशातच रमाईला बरे नव्हते. तिची प्रकृती खालावली होती. यशवंताची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे साहेब बेचैन होते. रमाई तर सारखी रडत होती. रमाईला साहेब समजावून सांगत होते. डॉक्टरांनी सल्ला दिला होता की, रमाईला हवा पालट करण्यासाठी तीन चार महिने मुंबई बाहेर पाठवावे. साहेबांना तर लंडनला जाणे अत्यंत जरूरीचे होते. तेवढ्यात धारवाडच्या विद्यार्थी वसतीगृहातील सुपरिटेंडन्ट वैराळे मामा मुंबईला आले होते. त्यांना मुंबईला आलेले पाहून साहेबांना बरे वाटले, ते वैराळे मामांना म्हणाले, ” वैराळे मामा ! रमा, यशवंत आणि लक्ष्मी या साऱ्यांची प्रकृती सध्या ठीक नाही, त्यांना हवा पाणी पालटण्यासाठी धारवाडला घेऊन जा म्हणजे मला लंडनला गेल्यावर त्यांची चिंता लागून राहणार नाही.” त्यावर वैराळे मामांनी पटकन होकार देऊन म्हणाले, ‘तुम्ही काही चिंता करू नका.’ वैराळे म्हणजे साहेबांचे कर्नाटकातील अनुयायी कार्यकर्ते होते. रमाई त्यांना भावाप्रमाणे मानत होती. त्यामुळे सगळे त्यांना मामा म्हणत होते. रमाई वैराळे मामाला म्हणाली, ‘आपण साहेबांना निरोप देण्यासाठी जाऊ या.’ परंतु साहेबांना ते पसंत नव्हते. डॉक्टर साहेब पुढे एका टॅक्सीने धक्क्यावर पोहोचले होते. साहेब पुढे उतरले तोवर रमाई व वैराळे मामा टॅक्सीने उतरले. त्यांना पाहून साहेब म्हणाले, “अरे ! तुम्ही कशाला आलात ?” तेव्हा त्यांना वैराळे मामा म्हणाले, ‘साहेब ! आई साहेब येत नव्हत्या, मीच त्यांना घेऊन आलो.’ त्यावर साहेब रमाईला म्हणाले, “रामू ! तू माझी उगीचच चिंता करू नकोस, माझी खाण्यापिण्याची सारी व्यवस्था आहे.” इतक्यात बोटीचा भोंगा वाजला आणि साहेब बोटीत बसता बसता वैराळे यांना म्हणाले,”रमा सारखी माझी काळजी करत असते. तिच्या तब्येतीकडे पाहून माझ्या मनात कालवाकालव होते.” वैराळे मामा म्हणाले, ‘तुम्ही काळजी करू नका ! मी रमाईची योग्य ती काळजी घेईन. आम्ही उद्याच धारवाडला जाणार आहोत.
रमाई, लक्ष्मीबाई, यशवंत, मुकुंद हे सगळे वैराळे यांच्याबरोबर धारवाडला गेले. वैराळे मामा मुलींच्या वसतिगृहामध्ये अधिकारी असल्याने रमाई त्या वसतिगृहावर जात असत. ते वसतिगृह पाहून त्यांचे मन रमले होते. कधी कधी स्वयंपाकात मदत करीत असत. तर कधी जेवण वाढण्यास मदत करीत असत. रमाई एक दिवस वसतिगृहावर गेल्या होत्या. त्यादिवशी वसतिगृहावर स्वयंपाक झाला नव्हता. मुले आणि मुली उपाशी होती. रमाईने वैराळे मामांना विचारले, ‘मुलांना उपाशी ठेवणार का ?’ त्यावर वैराळे मामा फार घाबरत आणि कंठ दाटून म्हणाले, ‘आईसाहेब ! ग्रँट मिळाली नाही, दुकानदार उधार देत नाहीत. मी खूप प्रयत्न केले, पण काय जमले नाही. मोठीच पंचाईत झाली आहे. ती लहान मुले दोन दिवसा पासून उपाशी आहेत. कारण वसतीगृहाला जे अन्न धान्याचे अनुदान महिन्याला मिळायचे ते अजून मिळालेले नाही ते मिळायला अजून तीन दिवस लागतील. अजून तीन दिवस ही मुले उपाशीच राहणार आहेत.'
त्यावेळी रमाई लगेच आपल्या खोली मध्ये जातात आणि रडत बसतात आणि कपाटातला सोनं ठेवलेला डबा आणि आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वैराळे यांच्याकडे देवून म्हणाल्या, “मला का नाही सांगितले, ह्या घ्या चार, सोन्याच्या बांगड्या, गहाण ठेवा, नाहीतर मोडून टाका. ताबडतोब किराणा माल आणा. मामा ! मुलांना उपाशी कसे ठेवता ? मी अजून तीन दिवस ही लहान मुले उपाशी नाही पाहू शकत.”
वैराळे मामांनी बांगड्या घेतल्या आणि तडक वाण्याकडे जाऊन गहाण ठेवल्या आणि सामान आणले. नंतर रमाई व लक्ष्मीबाईने स्वयंपाक केला आणि आईच्या ममतेने मुलांना जेवण वाढले. ते जेवून मुले तृप्त झाली. खूप आनंदी राहतात. हे पाहून रमाई खूप आनंदी होते. तिचा आनंद गगनात मावत नव्हता.
मुलांनी वैराळेंना विचारले, “सर ! आजचे जेवण देणारे दानशूर कोण आहेत ?”
वैराळे म्हणाले,”आजच्या दानशूर तुमच्या आमच्या सर्वांच्या माता आहेत.” त्यावर रमाई म्हणतात, “मुलांनो ! मला तुम्ही *रमाई* म्हणा, मला तुमची सर्वांची रमाई होता आले तर मी स्वतःला भाग्यवान समजेन.” अशी कनवाळू होती रमाई. मुला मुलींना जेवण देऊन तिने *रमाई* हा शब्द सार्थ ठरविला होता.
मग त्यावेळी ही सगळी लहान मुले रमाबाई यांना “रमाआई” म्हणून बोलायला लागतात. आणि त्या क्षणा पासून रमाबाई ही माता रमाई झाली आणि ती सगळ्यांची आई झाली.
म्हणूनच कवी म्हणतात...
“थोर पुरुषाच्या थोर पत्नीचा,
पाहिला गोड स्वभाव,
रमाबाई नाव तिचे रमाबाई नाव!
शुद्ध आचरण सुशील वर्तन,
पती चरणाशी वाही तनमन,
अलंकाराचे नाही प्रलोभन!!
वदतो सारा गाव,
रमाबाई! नाव तिचे रमाबाई नाव!!”
ख्यातनाम गायक “मिलिंद शिंदे” म्हणतात...
“भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, बांगड्या… सोन्याच्या रमान दिल्या काढुनी!
धन्य रमाई | धन्य रमाई |”
अहो एक एक पैसा,जमवून ऐसा,बांधुनी पदरा गाठी,
जिद्द ही मोठी, दिल्या भीमाला नोटी,
अशी रमाईनं जगविली, जनता कोटी !!!
बडोदा येथे बाबासाहेब नोकरीला गेले असता तेथे जातीचे चटके बसत होते, शेवटी निराश होऊन बाबासाहेब परत आले आणि रमाईंना असेच म्हणाले असतील...
अगं ये रमा आलो परतुनी, बडोद्यावरूनी,
गेलो होतो नोकरीला माझा अपमान झाला मी मोठा साहेब असुनी!!
सयाजीरावांचे फेडायला ऋण,
घेतली मी होती नोकरीची आन,
पाहुनीया जातीभेद
मला वाटला ग खेद,
सवर्णांची रूढी बघूनी,
आलो परतुनी, बडोद्यावरूनी!!
तिथला रमा मी पाहून रिवाज,
सोडूनिया आलो सारं कामकाज,
मी माणूस असूनी स्पर्श करेना गं कोणी,
किती घेऊ जहर पचवूनी,
आलो परतुनी, बडोद्यावरूनी!!
विद्येच्या जोराचा मारून दणका,
वर्ण भेदाचा मोडीन मणका,
भाग्यवंता देतो हमी,
मला नको ती गुलामी,
दावीन मी मुक्त करुनी,
आलो परतुनी, बडोद्यावरूनी!!
*पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची मागणी:-*
रमाईचा देवावर फार विश्वास होता. कारण तिचे वडील भिकू धोत्रे पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त होते आणि रुक्मिणी, तुळशीला नेमाने पाणी घालून रमाई पूजा करायची. भीकू घरातील विठ्ठल रुक्माईच्या प्रतिमांची पूजा पाठ करायचे. आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जायचे. घरात भक्तीमय वातावरण असे. रमाईच्या मनावर ते देव भक्तीचे संस्कार झालेले होते. त्यामुळे रमाई देवाची पूजा करायची. १९३१ सालची गोष्ट. रमाईने पंढरपूर बद्दल बरेच काही ऐकले होते. पांडुरंग भक्तांना पावतो, वेळ प्रसंगी हाकेला धावतो. जनाबाईचे दळण दळत असे, चोख्याची गुरे ओढत असे, गो-या कुंभाराची मडकी घडवित असे. असे दाखले भजन किर्तनातून ऐकले होते. रमाईची तब्येत बरी नव्हती तरी उपास तापास करीत असे. साहेब रमाईला खूप समजावून सांगत असत. रामू, मी माझ्या बुद्धीच्या बळावर आणि तुझ्या साथीने जीवनात यशस्वी होत आहे. तुझ्या भक्तीने किंवा नवसाने विजयी होत नाही. तू उगीच माझ्या विजयाचे श्रेय त्या देवाला – धर्माला देतेस. हे सारे ऐकून रमाईला ते पटत होते, परंतु मनावर झालेले संस्कार ती विसरत नव्हती. तिला वाटायचे आपले वडील पंढरपूरला जायचे, विठ्ठलाचे दर्शन करून येत असत, तसेच आपण ही एक दिवस पंढरपूरला जावं. विठ्ठलाचं दर्शन घ्यावं. आपल्या पतीला सुखी, त्यांना जीवनात यश देऊ दे असं मागणं मागावं या आशेने ती घाबरत घाबरत विचारते, ‘साहेब ! मला पंढरपूरला जाण्याची इच्छा आहे.’ अशी विनंती केली. साहेब रागावतील हे माहीत होते. परंतु ऐकले तर पांडुरंग पावला असे समजायचे असे ठरविले होते.
साहेबांनी शांत ऐकून घेतले आणि त्यांना खूप राग आला व म्हणाले, “रामू ! जो विठ्ठल आपल्या जातीच्या लोकांना देवळात घेत नाही, त्यांना दर्शन देत नाही, त्या देवाचं दर्शन घेण्यासाठी का जावं ? तो देव आपल्याला काय कामाचा ? चोखोबा विठ्ठलाचा भक्त होता, परंतु मरेपर्यंत विठ्ठलाने त्याला देवळात घेतले नाही किंवा त्याला दर्शन दिले नाही. विठ्ठलाने भक्तांना मदत केली, त्यांच्या मदतीला धावून आला हे सारे भास आहेत आणि साधू, संत, किर्तनकार यांनी विठ्ठलाचा महिमा वाढविण्यासाठी तशा दंतकथा व काल्पनिक कथा रचल्या आहेत आणि भजनातून, किर्तनातून भोळ्या भाबड्या लोकांना ऐकवल्या आहेत. प्रत्यक्षात असे काहीही घडले नाही. रामू ! तू तुझ्या मनातील पंढरीचा पांडुरंग काढून टाक. हे सारे थोतांड आहे. जिथे देवळात जाण्यासाठी प्रवेश नाही तिथे जाण्यात अर्थ आहे का ?” साहेब रागाने बोलत होते. रामू, माझा अशा देवावर बिलकुल विश्वास नाही.
रमाई म्हणते, ‘साहेब ! मग नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह का केला ?’ रमाई घाबरत घाबरत बोलत होती. साहेब काय बोलतात ते मनाचा हिय्या करून ऐकणार होती.
साहेब म्हणाले, “रामू ! तो सत्याग्रह देवाचं दर्शन घेण्यासाठी नव्हता. रामू तो लढा, तो सत्याग्रह समतेच्या हक्काचा होता. आम्ही जर हिंदू आहोत, तर इतर हिंदूंना मिळणारे हक्क आम्हाला का मिळू नयेत ? आम्ही ही माणसे आहोत, मग आम्हाला देवळात जाण्याचा हक्क का नाही मिळत ? यासाठी तो सत्याग्रह होता. पंढरपूरातील पुजारी, बडवे अस्पृश्यांना देवाचं दर्शन घेऊ देत नाहीत. तो पांडुरंग ही त्यांना बदलू शकत नाही. असा पांडुरंग काय कामाचा आहे ? सांग बरं !” साहेब जरी रागावले होते तरी रामूची भोळी भाबडी भावना ही ते जाणत होते. तिची समजूत कशी काढावी ? हा प्रश्न त्यांच्या समोर होता. साहेबांनी आपला राग आवरला आणि म्हणाले, “रामू ! आपण आपल्या त्यागाने नवे पंढरपूर निर्माण करु. तिथे कोणाला ही प्रवेश बंदी नसेल. तिथे कसल्याही प्रकारचे कर्मकांड, पूजा, आरती, प्रार्थना नसेल तिथे विज्ञानाचा गजर असेल. तिथे ज्ञानाचे धन असेल. तिथे समतेची सरीता वाहील. तिथे माळकरी टाळकरी नसतील, तिथे किर्तन करणारे, भजन करणारे नसतील. आपल्या पंढरपूरात डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्रोफेसर, साहित्यिक, लेखक – कवी जन्माला येतील. ते समता, मानवता, लोकशाही न्याय, बंधुत्व माणसा माणसात पेरतील. समाजाचे प्रबोधन करतील ते पंढरपूर सर्वांना खुले असेल. त्या पंढरपूरात देव नसेल, ते पंढरपूर माणसाचा महिमा वाढवणारे असेल. त्या पंढरपूरात माणसाचा गौरव होईल असे पंढरपूर आपण निर्माण करू. आपल्या पंढरपूरात माणसाला प्रगतीचा मार्ग दाखविला जाईल. मानवता समता टिकवता येईल याचे शिक्षण दिले जाईल. माणसा-माणसातील जातीयता नष्ट करून समता स्थापन करण्याचे ज्ञान दिले जाईल. असे आपले नवे पंढरपूर असेल.”
(रमाईने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पंढरपूरला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती, तेव्हा साहेब रमाईस काय म्हणतात, ते गीतात आणले आहे.)
नको जाऊ रमा गं त्या पंढरी ।
करू निर्माण आपण दुजी पंढरी ।
तिथे समता मिळेल सर्वांना खरी।
जिथे ज्ञानाच्या वाहतील सरीवर सरी॥धृ॥
ओढ पंढरीची लागली तुझ्या गं मना ।
बंदी देवळात जाण्याची दलित जना ।
घेतले नाही देवळात आपणा कधी ।
चोखोबा विठ्ठलाचा भक्त जरी ॥१॥
नव्या पंढरी मधी जात पात नसेल ।
बंधूभावाची ज्ञानाची प्रेरणा असेल ।
विज्ञानाची शिदोरी मिळेल जना ।
सारे जातील प्रगतीच्या शिखरावरी ॥२॥
ज्ञान भंडार सर्वांना मिळेल खुले ।
आनंदाची त्या पंढरीत उमलतील फुले।
बुद्धी वादाची शिकवण मिळेल तिथे ।
सारे समतेच्या बसतील पारावरी ॥३॥
नाही होणार कोणाचा तिथे अपमान ।
जन्मा येतील, डॉक्टर, वकील, विद्वान ।
मारुती वाणी गातील तिचे गुणगाण ।
सोड भोळेपणा रमा आता तरी ॥४॥
गीतकार : मारुती सरोदे
रमाईने साहेबांचं बोलणं, विचार व संकल्प नीट समजून घेतला आणि आपल्या अज्ञानाची तिला जाणीव झाली. आपल्या डोक्यात जे पंढरपूर होते ते काढून टाकले आणि साहेबांना म्हणाल्या, ‘आमच्या सारख्या भोळ्या भाबड्या माणसाला हे सारं समजलं नाही, म्हणून तर आजही लाखो लोक त्या पंढरपूरात जातात आणि भक्तिभावानं, आंधळ्या श्रद्धेने दर्शन घेतात. पण साहेब, आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. आता मी नाही जाणार पंढरपूरला, उलट तुम्ही जे पंढरपूर निर्माण करणार आहात त्यासाठी मी तुमच्या पाठीशी राहीन. वाटेल ते कष्ट आणि त्याग करीन. मी आता ते पंढरपूर डोक्यातून काढून टाकले.’
रमाचे ते विचार ऐकून साहेब म्हणतात, “आता तू माझी पत्नी शोभते आहेस. नाहीतर लोक म्हणाले असते; पती विज्ञानवादी आणि पत्नी अज्ञानवादी.
मी तुझे आभार मानतो. इतक्या लवकर तू मला समजून घेतलेस आणि माझ्या मनासारखा निर्णय घेतलास."
*निर्वाण:-*
पतीनिष्ठ रमाईचे उदाहरण दृष्टीसमोर ठेवून बाबासाहेब जाहीरपणे सांगत असत की, स्त्री हा समाजाचा अलंकार आहे. आपल्या कुटुंबाच्या अन् कुळाचा नावलौकिक स्त्रियांच्या शीलावरच अवलंबून असतो. स्त्री ही जशी गृहिणी तशीच सुसंस्कारित समाज निर्माण करणारी माता आहे. परंतु वैवाहिक जीवनाच्या प्रारंभीच्या काळात त्यांच्यावर उपासमार, हालपेष्टा, दुःख, दारिद्र्य व चिंता यांचे जे प्रसंग ओढवले त्यामुळे त्यांच्या शरीर-प्रकृतीवर जो परिणाम झाला तो कायमचाच. त्या नेहमी आजारी असायच्या आणि एकदा त्या अंथरुणाला खिळल्या त्या कायमच्याच. १९३५ च्या सुमारास रमाईचे शरीर काबाड कष्टाने पोखरुन गेले होते. रमाईचा आजार बळावला होता. इ.स. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच चालला होता. मे, १९३५ ला तर आजार खूपच विकोपाला गेला. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. औषधोपचारही लागू होत नव्हता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत.
त्यांनी हळूच डोळे उघडले. आपल्याजवळ बाबासाहेबांना पाहून त्यांना मानसिक समाधान झाले. बाबासाहेबांकडे एकटक पाहून त्यांनी क्षीण हास्य केले. आणि पतीचे रूप ती साध्वी आपल्या हृदयात नेहमीकरिता जणू साठवून ठेवीत होती.
बोलण्याचा प्रयत्न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वत: बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वत:च्या हाताने पाजण्याचा प्रयत्न करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असत. त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही. आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर दीनांना पोरका करणारा दिवस उजाडला.
रमाईंनी अंथरूणच धरले. बाबासाहेब त्यांच्या जवळ बसून त्यांना धीर देत असत.
२७ मे, १९३५ ला राजगृहात त्या पलंगावर झोपल्या होत्या त्यांनी साहेबांना पाहिले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले . त्यांना काहीतरी सांगायचे होते. मोठ्या प्रयासानी त्यांनी आपला हात वर केला परंतु तो हाथ एकाएकी खाली पडला.
‘बहिष्कृतांचा ह्रदयसम्राट बाबासाहेब’ यांची मुद्रा कोमेजून गेली, मन भरून आलं, ते अनिमिष डोळ्याने व व्याकुळ मनाने रमाबाईंचा चेहरा बघत होते, आयुष्याच्या शेवटच्या क्षणी हे युगपुरुष रमाबाईजवळ बसले होते, मी एक युगंधराची, महापुरुषाची पत्नी आहे, ग्रंथाचा महाग्रंथ आपली सेवा करीत आहे, ह्या क्षणाचा आनंद ह्यावेळी रमाबाईच्या काळोख दाटलेल्या डोळ्यांतून स्पष्ट झळकत होता, आयुष्यात पहिल्यांदाच आणि शेवटच्या घटकेला हे अपूर्व सुख रमाबाईला मिळालं होतं, सूर्य क्षितिजाआड झाला, आसमंत, साऱ्या दशदिशा अंधारल्या होत्या, आता रमाबाईंच्या जीवनाची वाटही अंधारू लागली होती,…..आणि…..आणि…. शेवटी अंधाराच्या एका अदृश्य लोंढ्याने राजगृहात रमाईच्या श्वासाकडे झेप घेतली, कोट्यावधी रंजल्यागांजल्यांच्या आईची, रमाईची २७ मे, १९३५ रोजी सकाळी ९.०० वाजता प्राणज्योत मालवली,…….त्या शांत नितळ आसमंतात एका करुणेच्या महाकाव्याची समाप्ती झाली,…
महापुरुष रमाईविना अगतिक झाले…..
पाण्यात ढेकूळ विरघळावे तसे बाबासाहेबांचे मन विरघळले होते. त्यांच्या मुद्रेवर गंभीर वृत्ती दिसत होती, मनाच्या अंतर्मनात कल्लोळ चालला होता…
ते विषन्न मनानं शून्यात बघत राहिले,…
रमाईच्या शेवटच्या क्षणीही पतीच्या यशाचे कौतुक, समाधानाचे चेहऱ्यावरील भाव, व मनातील काहीतरी सांगण्याची चलबिचलता, अर्थातच त्यांच्या भावनांचं अफाट दर्शन होत होते, त्यावेळी रमाईचा स्वतःशीच चाललेला संघर्ष बाबासाहेबांच्या मनालाही जाणवत असेल.
रमाबाईंनी त्या क्षणी अखेरचा श्वास बाबासाहेबांच्या कुशीतच घेतला आणि आपल्या पतीच्या मांडीवर अखेर मरण पत्करले. साहेबांनी हंबरडा फोडला. माझी रामू..रामू..रामू…मला सोडून गेली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यवधी रंजल्या गांजल्याची रमाई माता त्यांना अंतरली होती.
दुपारी २ वाजता रमाईची प्रेतयात्रा वरळी स्मशानाकडे निघाली.
*आम्हा दुरावली मायेची सावुली !*
*निर्वाण पावली आमची रमाई माऊली!!*
पहाडा सारखे महामानव बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणार्या रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले.
बाबासाहेबांच्या मनात कदाचित असेच शब्द गुंफले असतील...
“जन्माची जोडी आपली तोडुनी, चाललीस रमा तू मला सोडूनी”
ही अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत नेण्यात आली आणि पुत्र यशवंतानी सर्व विधी पार पाडले. रमाबाई यांचे कलेवर दफन करण्यात आले. त्यागाची एक मूर्ती तिने ह्या जगाचा त्याग केला.
माता रमाबाई भीमराव आंबेडकर!, भारतातील करोडो पददलितांची, अव्हेरलेल्यांची माऊली. आयुष्यभर झाडासारखी उन्हात उभी राहिली आणि तिने करोडो लोकांना सावली दिली. ती मंद वाऱ्याची झुळूक झाली. ही माऊली जशी त्यागमूर्ती होती त्याच प्रमाणे चराचरांवर प्रेम करणारी माऊली होती. दुधावरची साय होती. परोपकार हा तिचा धर्म होता, तिचा त्याग हाच आंबेडकरी समाजाचा ठेवा आहे. महिलांचा तो आदर्श आहे. ह्या मातेने आपले जीवन बाबासाहेबांच्या कार्याप्रती समर्पित केलेच नसते; तर बाबासाहेबांना शून्यातून जग निर्माण करता आले नसते. बाबासाहेबांनी चाळीस-पंचेचाळीस वर्षात पंखविहीन पक्षांना पंख दिले, पंखात बळ ओतले त्यामुळेच सरपटणारे प्राणी गरुड झेप घेऊ शकले. या सगळ्या किमयेत किमयागार डॉ. बाबासाहेब असले; तरी या किमयेच्या भागीदार आहेत 'आईसाहेब तथा रमाबाई आंबेडकर.' बाबासाहेबांच्या लढ्याला ऊर्जा देऊन त्याला उर्ज्वस्वल करण्याचे काम याच मातेने केले आणि तेही अर्धपोटी राहून.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर घडण्यासाठी निश्चितच रमाईचा त्याग, संघर्ष आणि साथ होती. आपणास हे विसरून चालणार नाही! नाहीतरी जागतिक वास्तू दीक्षाभूमी नागपूर येथे असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत पत्नी म्हणून किती फोटोत
रमाई आहेत, हे डोळे उघडे ठेवून पहावं! मस्तकात असणाऱ्या मेंदूला विचारावं! निश्चितपणे आपण ‘रमाई ‘वाचून,समजून घेवूया.
पुढे १९४६ आणि १९५१ साली सिद्धार्थ कॉलेज आणि मिलिंद विद्यालय स्थापन झाल्यावर डॉ. भीमरावांना रमाईची आठवण आली आणि मनात म्हणाले, “माझी रामू असती तर तिला सांगितले असते, "रामू ! हे आपले पंढरपूर आहे. तेव्हा माझी रामू किती आनंदीत झाली असती. परंतु हे नवे पंढरपूर पाहण्यासाठी तिला आयुष्य लाभले नाही. काळाने तिला नेले हे माझे दुर्दैव म्हणावे लागेल.”
▪️▪️▪️
No comments:
Post a Comment