आम्ही भारताचे लोक-
प्रजासत्ताक भारताचे संविधान लिहून पुर्ण झाल्यावर त्याच्या प्रारंभी कोणता शब्द असावा यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सखोल विचार करून ठरवले की ह्या संविधानाचे सार्वभौम, सर्वोच्च उर्जाकेंद्र लोक=प्रजा असल्यानं
"आम्ही भारताचे लोक " अशी प्रास्ताविकेची [सरनाम्याची] सुरूवात करायची.
घटना परिषदेत त्यांनी त्याबद्दलची सविस्तर भुमिका मांडली.
मात्र मालवियांना "इन दि नेम ऑफ गॉड" अशी सुरुवात हवी होती तर मौलाना हसरत मोहनींना "अल्लाह के नाम" अशी सुरूवात हवी होती.
कोणाला प्रारंभी राम तर कोणाला गणपती हवा होता. असंख्य सुधारणा सुचवल्या गेल्या.
बाबासाहेबांनी त्या सर्व नाकारल्या.
ते म्हणाले, " तुमचा काहीतरी गोंधळ होतोय. हे देवलोकाचे संविधान नाहीये. हे लोकशाहीचे संविधान आहे. त्यामुळे "आम्ही भारताचे लोक " अशीच प्रास्ताविकेची [सरनाम्याची] सुरूवात करण्यावर मी ठाम आहे. हवे तर मतदान घ्या.
अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांनी विचित्र भुमिका घेतली. ज्यांना देव हवा त्यांनी देवाला तर ज्यांना लोक हवेत त्यांनी लोकांना मते द्यावीत असे पर्याय त्यांनी दिले.
घटना सभेचे सभासद महाचतुर.
लोकांना नाराज केले तर उद्या मतं मागायला कोणाकडं जायचं?
देवाला नाराज केलं तरी असून अडचण नसून खोळंबा.
भारतातील सर्व धर्माचे देव विरूद्ध 33 कोटी लोक असा जंगी सामना झाला.
2/3 सभासद तटस्थ राहिले.
देवाला 42 तर लोकांना 68 मतं पडली.
म्हणुन हे लोकांचे राज्य आहे. प्रजासत्ताक आहे.
ज्यांचे ज्यांचे मतदार यादीत नाव आहे ते सर्व देशाच्या सात बाराचे मालक म्हणजेच देशाचे मालक!
तर मालक लोकहो, अभिनंदन आणि शुभेच्छा!
-प्रा.हरी नरके
No comments:
Post a Comment