Sunday, 30 January 2022

जोगेंद्रनाथ मंडळ यांना116 व्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन! 💐


💐 बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी जोगेंद्रनाथ मंडळ यांचे कार्य व कर्तृत्व. या महापुरुषांने रिपब्लिकन पक्षाचा प्रचार करतांना मृत्यूला आलिंगन दिले. 29 जानेवारी ला 116 व्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन! 💐

✍️ उमेश गजभिये. मो. 9326887326.

बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी जोगेंद्रनाथ मंडळ या महापुरुषांचा जन्म 29 जानेवारी 1904 ला झाला. पश्चिम बंगाल मधील निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करतांना 5 ऑक्टोबर 1968 ला सायंकाळी साडे सहा वाजता त्यांचे परिनिर्वाण झाले. दलित आणि गरीब जनतेच्या संरक्षणासाठी जोगेंद्रनाथ मंडळ यांनी बाबासाहेब डॉ. आंबेडकरांना भारतीय संविधान सभेवर निवडून देण्यात एक महत्वाची भूमिका निभावली आहे. हे त्यांचे एक ऐतिहासिक कार्य होते.

बाबासाहेब डॉ आंबेडकरांनी 1917 पासून भारतीय अस्पृश्यांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी भारताच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. नागपूर प्रदेशातील व त्यावेळच्या मध्यप्रांत च्या अस्पृश्यांच्या प्रचंड प्रयत्नामुळे नागपूरात बाबासाहेब डॉ. आंबेडकरांना अस्पृश्यांचा एकमेव नेता घोषित करण्यात आले. राजर्षी शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली 1920 मध्ये नागपुरात अखिल भारतीय दलित परिषदेचे झालेली आहे. या वेळेपासून बंगाल प्रांतातील अनेक अस्पृश्य दलित नेत्यांचा बाबासाहेब आंबेडकरांना पाठिंबा मिळू लागला होता. बंगाल प्रांतातील ज्या नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या या अस्पृश्योउद्गारक चळवळीत पाठिंबा दिला त्यांच्यामध्ये महापुरुष जोगेंद्रनाथ मंडळाची यांची भूमिका महत्त्वाची आहे. 

जोगेंद्रनाथ मंडल यांचा जन्म आजच्या बांगलादेशच्या बोरिसल जिल्ह्याच्या उत्तर प्रांतात असलेल्या गौरनदी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मास्तरकांडी गावात नमोशुद्र जातीच्या एका अस्पृश्य असणाऱ्या साध्या शेतकरी कुटुंबात गुरुवारी 29 जानेवारी 1904 रोजी झाला. जोगेंद्रनाथ मंडल हे समंजस होत असतांना त्यांच्या लक्षात आले की अस्पृश्य नमोशुद्र या जातीवर बंगाल प्रांतात अतोनात छळ केला जातो व त्यांना त्यांच्या हक्क व अधिकारा पासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बांधवांवर होणाऱ्या अत्याचार याला मदत करणयासाठी, त्यांनी 1934 मध्ये कलकत्ता विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवून कायद्याचा सराव सुरू केला. 1934 पासून त्यांनी अस्पृश्यांचे शोषण, पीडितांचे शोषण, शेतकऱ्यांचे प्रश्न, मजुरांचे प्रश्न याकरिता जोगेंद्रनाथ यांनी अनेक न्यायालयीन खटले लढले. यामुळे जोगेंद्रनाथ बंगाल प्रांतातील अस्पृश्य जनतेत अल्पावधीतच प्रसिद्ध झाले. जानेवारी 1936 मध्ये जोगेंद्रनाथ मंडल यांनी गौरनदी मधील लोकत बोर्डाची निवडणूक जिंकली. त्याच वर्षी ते भाखडगंज ईशान्य जनरल सीटवरून बंगाल विधानसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले. आमदार असताना त्यांनी अस्पृश्य दलितांच्या हिताची अनेक जनकल्याणकारी कामे केली. 1938 मध्ये त्यांनी "स्वतंत्र अनुसूचित जाती पक्षाची" स्थापना केली. जोगेन्द्रनाथ मंडळ 1940 च्या दशकात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जवळ आले. याचाच परिणाम म्हणून, 1940 साली कलकत्ता महानगरपालिकेत "कॉन्सिलर" म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

24 एप्रिल 1942 रोजी नजीमुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली बंगाल मंत्रिमंडळाची स्थापना झाली. यामध्ये जोगेंद्रनाथ मंडळाला सहकार आणि ग्रामीण पत वितरण मंत्री करण्यात आले. ते मंत्री असताना अनेक अस्पृश्य दलित आणि शेतकऱ्यांची कर्जे त्यांनी माफ केली. बंगाल प्रांतातील सरकारी कार्यालयांमध्ये भरतीचे मार्ग अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आले. त्यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात प्रवेशकरिता येणारे अडथळे दूर केले. तसेच त्यांनी अस्पृश्य विध्यार्थ्यांकरिता
अनेक शासकीय वसतिगृहांची स्थापना केली.

बाबासाहेब आंबेडकरांचे अस्पृश्यांकरिता केलेल्या कार्याने प्रभावी होऊन व प्रेरित झाल्याने, मे 1943 मध्ये जोगेंद्रनाथ मंडल यांनी त्यांची 'स्वतंत्र अनुसूचित जाती पार्टी' बरखास्त केली आणि बाबासाहेब डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या "ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनशी" संलग्न झाले. व बाबासाहेब आंबेडकरांच्या सूचनेनुसार त्यांनी "ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनशी" बंगाल प्रदेश शाखेची स्थापना केली. काही दिवसांत बंगाल प्रांतात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. "ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या" वतीने भारतभरातून 51 उमेदवार उभे केले गेले. पण एकमेव जोगेंद्रनाथ मंडळ वगळता या निवडणुकीत कोणीही यशस्वी होऊ शकले नाही.

ऑक्टोबर, 1946 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली भारताचे अंतरिम सरकार निर्माण झाले. बॅरिस्टर जिना यांनी मुस्लिम लीग च्या कोट्यातून भारत सरकारच्या या अंतरिम सरकारमध्ये मनोनीत केले. 4 नोव्हेंबर 1946 मध्ये त्यांनी या सरकारमध्ये "कायदा मंत्री बनवले गेले.

कायदा मंत्री म्हणून काम करत असताना जोगेंद्र मंडळाने बंगालमध्ये उसळलेल्या जातीय दंगलींना शमवण्यासाठी अनेकांच्या भेटी घेऊन आणि बैठका आणि परिषदांच्या माध्यमातून लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यासोबतच त्यांनी 'हिंदू कोड बिल' अंतरिम भारतीय संसदेत ठेवण्याचाही प्रयत्न केला.
भारताच्या फाळणीबरोबरच पंजाब आणि बंगालचीही फाळणी होणार होती. जोगेंद्रनाथ मंडल यांना बंगालचे विभाजन नको होते. त्यांचा असा विश्वास होता की पूर्व बंगालमधील बहुतेक उच्च जातीचे हिंदू श्रीमंत आणि शक्तिशाली आहेत. ते पूर्व बंगालमधून पश्चिम बंगालकडे सहज जाऊ शकतात. परंतु पूर्व बंगालमधील अस्पृश्य दलित, गरीब, शेतमजूर, मजुरी करून आणि मासे पकडून आपले उदरनिर्वाह करतात. पश्चिम बंगालमधील या सर्व निराधार गरीब दलितांचे पुनर्वसन करणे कोणत्याही प्रकारे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी बंगालला अखंड राहणे आवश्यक मानले. बंगालच्या फाळणीसाठी आंदोलन सुरू होताच जोगेंद्रनाथ मंडळाने बंगालमध्ये ठिकठिकाणी बैठका आयोजित केल्या आणि बंगालची फाळणी त्यांच्या हिताची कशी नाही हे लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी, बंगालच्या विभाजनाला विरोध करताना त्यांनी अशी मागणीही केली की, जर बंगालचे विभाजन झाले तर उत्तर बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्याचा सिलीगुडी विभाग, जलपाईगुडी आणि दिनाजपूर जिल्हा आणि रंगपूरचा वायव्य भाग, बिहारच्या पुनिया जिल्ह्याचा भाग आणि आसामच्या गोयलपारा जिल्ह्याबाबत अस्पृश्य दलितांसाठी स्वतंत्र राज्य देण्याची व्यवस्था असावी. हे त्यांचे म्हणणे न्यायीचीत व बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या दिशानिर्देश प्रमाणे होते. याकरिता "ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनशी" बंगाल प्रदेश कार्यकारिणी त्यांच्या मदतीला होती.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत आणि पाकिस्तानला सार्वभौम देश म्हणून घोषित करण्यात आले. यांमध्ये बंगालची फाळणी झाली. जोगेंद्रनाथ मंडल बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांच्याशी सल्लामसलत करून
पाकिस्तानातील अस्पृश्य आणि हिंदूंच्या सुरक्षेसाठी त्यांनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला आणि ते पाकिस्तानात गेले. अस्पृश्यांच्या हितासाठी राजकारण करतांना जोगेंद्रनाथ मंडलांनी इतर पक्षांशी मैत्री केली. पण बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचा कधीही विश्वासघात केला नाही. याउलट त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांप्रती असलेली त्यांची निष्ठा त्यांच्या कार्याने आणखी दृढ केली. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचा वतीने, बाबासाहेब आंबेडकरांनी 1946 च्या विधानसभा निवडणुकीत देशभर एकूण 51 ठिकाणी उमेदवार उभे केले. संयुक्त मतदार संघात हिंदूंच्या वर्चस्वामुळे अस्पृश्य दलितांचे खरे प्रतिनिधी निवडणूकित हरले आणि 'हरिजनवादी' उमेदवार काँग्रेसच्या मधून निवडून आले. अशा कठीण परिस्थितीत शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचा वतीने बंगाल प्रांतातून केवळ जोगेंद्रनाथ मंडळ एकटे निवडून आले.

जुलै 1946 मध्ये, भारतीय संविधानाची निर्मिती करण्यासाठी संविधान सभेच्या स्थापनेसाठी निवडणुका झाल्या. या निवडणुकीत मतदानाचा अधिकार फक्त आमदारांना होता. बाबासाहेब डॉ. आंबेडकरांना चांगलेच माहीत होते की त्यांना कांग्रेस महाराष्ट्रातून किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून उभे राहल्यास सर्व शक्ती पणाला लावून जिंकू देणार नाही. परंतु कोणत्याही परिस्थितीत बाबासाहेब आंबेडकरांना निवडणूक जिंकून संविधान सभेमध्ये प्रवेश घेणे आवश्यक होते. कारण भारतातील सर्व अस्पृश्यांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. तसेच केवळ अस्पृश्यच नव्हे तर संपूर्ण भारताला एक संघ लोकशाहीयुक्त बनवण्यासाठी संविधान सभेत निवडून येणे आवश्यक होते. ही कल्पना जोगेंद्रनाथ मंडलांना ही हीती व त्याबाबत त्यांचे बाबासाहेब आंबेडकरांशी बोलणे झाले होते. अशा वेळी, त्यागमय मूर्ती जोगेंद्रनाथ मंडलांनी बाबासाहेब आंबेडकरांना बंगाल प्रांतातून निवडणूक लढवण्यास करिता शाश्वती दिली. आणि कोणत्याही परिस्थितीत बाबासाहेब आंबेडकरांना बंगाल मधून निवडुन देऊ असे वचन दिले. जोगेंद्रनाथ मंडलांच्या वचनांचा सन्मान ठेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी बंगालच्या बोरिसल प्रदेशातून निवडणूक फॉर्म दाखल केला. आणि बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणण्यासाठी जोगेंद्रनाथ यांनी प्राणपणाला लावले. त्यांच्या प्रयत्नांमुळे बाबासाहेब आंबेडकर हे बंगाल प्रांतातून संविधान सभेकरिता निवडून आले.

जोगेंद्रनाथ मंडल यांना पाकिस्तान सरकारमध्ये कामगार आणि कायदा मंत्रीही केले गेले. पाकिस्तानमध्ये राहत असताना जोगेंद्रनाथ मंडल यांनी पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदूंच्या हिताचे अनेक कायदे केले. तसेच अस्पृश्य आणि हिंदूंच्या संरक्षणासाठी काम केले. जोपर्यंत मोहम्मद अली जिना जिवंत होते, जिनांचा जोगेंद्रनाथ मंडल यांना काही प्रमाणात पाठिंबा होता.

मोहम्मद अली जिना यांच्या मृत्यूनंतर मौलवी कट्टरपंथीयांनी पूर्व पाकिस्तानातील ढाका येथील नयरनगंज, बोरिशल, खुलना इत्यादी भागात जातीय दंगली भडकवून लाखो अस्पृश्य आणि हिंदूंवर अत्याचार केला आणि त्यांची हत्या करण्यात आली. अस्पृश्य लोकांचा अतोनात छळ पाकिस्तानात होत आहे असे जोगेंद्रनाथ यांना दिसून आले. पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात जोगेंद्रनाथ मंडळ हे एकमेव बिगर मुस्लिम मंत्री होते. पाकिस्तानात अस्पृश्य दलित हिंदूंना मुस्लिम धर्म घेण्यास बळजबरी केली जात होती. त्याकरिता अस्पृश्य हिंदूंची हत्या होत होती. त्यांची घरे जाळली जात होती. त्याची मालमत्ता लुटली जात होती. मुलींचे अपहरण केले जात होते, बलात्कार केले जात होते आणि जबरदस्तीने मुस्लिम मुलांशी लग्न केले जात होते. अस्पृश्य दलित आणि हिंदू महिलांवर मुस्लिम कट्टरपंथी या कडून बलात्कार होत होते. त्यामुळे तेथे धार्मिक दंगल सुरू होती. अश्या परिस्थितीत जोगेंद्रनाथ मंडल यांनी दंगलग्रस्त भागांना भेट देऊन दंगलखोरांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण मौलवी मूलतत्त्ववाद्यांनी दंगल भडकवण्याचे काम चालू ठेवले होते. अश्या तणावपूर्ण स्थितीत जोगेंद्रनाथ मंडलांना समजले होते की आता कट्टरपंथी मुस्लिमांसोबत राहून अस्पृश्य हिंदूंचे भविष्य सुरक्षित राहू शकत नाही. म्हणून त्यांनी 8 ऑक्टोबर 1950 रोजी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पाकिस्तानच्या कामगार आणि कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर जोगेंदनाथ मंडळ भारतात स्थायिक झाले. जेव्हा जोगेंद्रनाथ पाकिस्तानात होते. तेव्हापासून त्यांच्या मदतीने व साहाय्याने लाखों अस्पृश्य दलित आणि हिंदू लोक पाकिस्तान मधून पलायन जरून त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून ते निर्वासित म्हणून भारतात आले होते. त्यातील बहुसंख्य हिंदू धर्मिय लोकांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी भारत सरकारने भरघोष मदत केली. परंतु निर्वासित अस्पृस्य नमोशूद्र यांचे जीवनमान उंचावण्यासाठी भारत सरकारने पुरेसे प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे आजही भारतात आलेले हे बहुसंख्य निर्वासित अस्पृश्य हलाकीचे जीवन कंठीत करतांना आढळून येतात.

जोगेंद्रनाथ भारतात आल्यानंतर, पाकिस्तान मध्ये अस्पृश्य दलित आणि हिंदूंच्या संरक्षणासाठी त्यांच्यासारखा नेता नसल्याने, अस्पृश्य दलित आणि हिंदू जे पाकिस्तानमध्ये स्थायिक झाले होते. त्यांचा पाकिस्तानातून भारतात येण्याचा वेग आणखी वाढला. हे सर्व लोक पाकिस्तानातून भारतात आले आणि निर्वासनात आपले जीवन जगत होते. त्यांनी निर्वासित अस्पृश्य हिंदूंच्या व हिंदूंच्या वेदना जवळून पाहिल्या आणि अनुभवल्या होत्या. त्यामुळे जोगेंद्रनाथ यांनी भारतात आल्यावर पाकिस्तान मधून भारतात आलेल्या अस्पृस्य निर्वासितांची समस्या सोडवण्याचा जीवाची बाजी लावली. 

बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुरात बौद्ध धर्माची दीक्षा घेतली अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. बौद्ध धर्माच्या दीक्षेमुळे धर्मांतरित बौद्धांना पूर्वीच्या अनुसूचित जातींच्या यादीत समाविष्ट असलेल्या लोकांना या यादीतून वगळण्यात आले आणि या धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातींना दिलेल्या सर्व सुविधा भारत सरकारने बंद केल्या होत्या. भारत सरकारमधील काही हिंदू नेत्यांच्या दबावामुळे भारतीय राष्ट्रपती यांनी त्यांना असणाऱ्या विशेष संविधानिक अधिकारान्वये फक्त हिंदू धर्मिय असणाऱ्या अनुसूचित जातींना लाभ घेता येईल असा कायदा 1950 केला. त्यामुळे धर्मांतरीय बौद्धांना अनुसूचित जातींच्या यादीतून वगळण्यात आले. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी परिनिर्वाण झाले होते. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यापूर्वी रिपब्लिकन पक्ष हा राजकीय पक्ष स्थापनेची घोषणा केली होती. धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातीचे हक्क हिरावून घेतले होते. अशा कठीण परिस्थितीत रिपब्लिकन पक्षातील दलित नेते एन, शिवराज, दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर राजभाऊ खोब्रागडे, ऍड बाबू आवळे व इतर नेत्यांनी त्यागमूर्ती जोगेंद्रनाथ मंडलांशी चर्चा केली. कारण त्यांना माहित होते की जोगेंद्रनाथ हे कायदे पंडित आहेत व केवळ जोगेंद्रनाथ मंडलच अशा कठीण परिस्थितीत मार्ग काढू शकतात व धर्मांतरित बौद्धांना न्याय देऊ शकतत्. जोगेंद्रनाथ मंडल यांनी विलंब न करता, प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी पत्रव्यवहार करून, धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातींमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सूचना दिल्या. त्याचप्रमाणें जवाहरलाल नेहरू व इतर कांग्रेसी नेते यांच्यासोबत त्यावेळेस रिपब्लिकन पक्षातील प्रमुख नेत्यांनी पत्रव्यवहार केला व व्यक्तिशः वार्तालाप केला. त्यामुळे महाराष्ट्रापुरते धर्मांतरित बौद्धांना "नवबौध्द" या नावाने अनुसूचित जातीच्या सुविधा देण्याचे तोडगा काढणायत आला. परंतु उर्वरित भारतातील दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला असेल तर त्यांना अनुसूचित जातीच्या सुविधा 1990 पर्यंत मिळाल्या नाहीत.

त्यामुळे भारतात इतर राज्यातील दलित जनता बौद्ध धर्म स्वीकारल्यावर ही "नोकरीत व शैक्षणिक लाभाप्राप्तीसाठी" सर्टिफिकेट वर स्वतःच धर्म हिंदू लिहावे असा त्यांनी तोडगा काढला.

भारतात प्रबळ काँग्रेससारख्या सत्ताधारी पक्षाला पराभूत करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रबळ विरोधी पक्ष असावा याकरिता सर्व विरोधी भारतीय प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन एक सर्वसमावेशक राजकीय पक्ष निर्माण करण्यासाठी निमंत्रण दिले व त्या राजकिय पक्षाला "रिपब्लिकन पार्टी'" असे नाव दिले. भारताकरिता बाबासाहेब आंबेडकरांनी राजकिय पक्षाची संकल्पना जाहीर केली. त्यासाठी त्यांनी प्रख्यात साहित्यिक पी.के. अत्रे, राममनोहर लोहिया, प्रसिद्ध समाजवादी नेते एस. जोशी यांच्याशी पत्रव्यवहार केला व चर्चा केली. यात जोगेंद्रनाथ मंडल यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. एक विरोधी सशक्त राजकिय पक्ष असावा या बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिका संदेर्भात,1956 मध्ये या विषयावर निर्णय घेण्यासाठी बिहारच्या पाटणा येथे एक अधिवेशनही आयोजित करण्यात आले होते. या सत्राच्या वेळी अचानक बिघडलेल्या तब्येतीमुळे बाबासाहेबआंबेडकर येथे उपस्थित राहू शकले नाहीत. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे डॉ.राममोहन लोहिया होते. या अधिवेशनात बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका काय आहे, हे सांगण्याची जोगेंद्रनाथ मंडळाची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. 6 डिसेंबर 1956 रोजी आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणामुळे रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेमध्ये इतर विरोधी प्रमुख नेत्यांनी त्यानंतर सहभाग घेणे टाळले.

बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्ष हा राजकीय पक्ष 30 सप्टेंबर 1956 ला घोषित केल्याप्रमाणे त्याचा आदर्श ठेवून, त्यांच्या दलित सहकाऱ्यांनी ज्यात प्रमुख होते दादासाहेब गायकवाड, एन. शिवराज, बॅरिस्टर राजभाऊ खोब्रागडे व ऍड अवलेबाबू यांनी यासंदर्भात जोगेंद्रनाथ मंडल यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या सल्ल्यानुसार 3 ऑक्टोबर 1957 रोजी नागपूरच्या विशेष अधिवेशनात 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' ची स्थापना केली. व अध्यक्ष म्हणून एन. शिवराज यांना अध्यक्ष निवडण्यात आले. याकाळात जोगेंद्रनाथ मंडल यांनी राजकीयदृष्ट्या रिपब्लिकन पक्षाशी सहानुभूती ठेवली. परंतु त्यांना त्यावेळेस पाकिस्तानमधून आलेल्या 50 लाखांच्या वर अस्पृश्य नमोशुद्र निर्वासित जातीचे उत्थानासाठी कार्यरत राहणे हा मार्ग निवडला. अस्पृश्य नमोशुद्र जातीला भारत सरकारने अनुसूचित जातीच्या यादीत समाविष्ट केले नव्हते. त्यामुळे निर्वासित म्हणून जीवन जगणाऱ्या नमोशुद्र जातींना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागत. अत्यंत हलाकची गरिबीची स्थिती, त्यामुळे मुलांना पैशाअभावी शिक्षण देणे ही मोठी समस्या होती. नमोशुद्र यांना भारत सरकार अनुसूचित जातीची सवलत देत नव्हती. त्यामुळे शिक्षण व नोकरी मध्ये अडथळे निर्माण झालेले होते. मोलमजुरी करून नमोशुद्र दलितांना जीवन कंठीत जगावे लागत होते. याकरिता जोगेंद्रनाथ मंडल भारत सरकारचे प्रधानमंत्री नेहरू, इतर मंत्री यांच्याशी सतत पत्रव्यवहार करीत होते. जोगेंद्रनाथ यांची स्वतःची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट झालेली होती. ते एका मित्राने त्यांना कलक्त्यात दिलेल्या टिनाच्या शेडमध्ये राहून दलितांच्या हितासाठी कार्यरत होते. 1962 पर्यंत त्यांनी नमोशुद्र जातीला अनुसूचित जातीच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी शेकडो वेळा पत्रव्यवहार केला. या कार्यात त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी वेळोवेळी सहकार्य केले.

1957 नंतर जोगेंद्रनाथ मंडल यांच्याशी सतत संपर्कात असणाऱ्या रिपब्लिकन नेते दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर खोब्रागडे व बी पी मौर्य यांची विनंतीला मान्य करून, प्रत्यक्षात रिपब्लिकन पक्षाला सहकार्य करण्याचे वचन दिले. 1962 मध्ये दिल्लीतील एका प्रचंड गर्दीच्या सभेत जोगेंद्रनाथ मंडल यांनी रिपब्लिकन पक्षात अधिकृतपणे प्रवेश घेतला. रिपब्लिकन पक्षाशी त्यांचे हे नाते मृत्यू होईपर्यंत होते. 1963 मध्ये, जोगेंद्रनाथ मंडल यांनी पश्चिम बंगालमध्ये 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' अधिकृत शाखा स्थापना केली. 1962 पासून जोगेंद्रनाथ हे सतत रिपब्लिकन पक्ष भारतात वाढवण्यासाठी प्रचारार्थ दिवस रात्र कार्यरत होते.
जोगेन्द्रनाथ मंडल यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केल्यापासून त्यांनी संपूर्ण भारतात रिपब्लिकन पक्षाच्या प्रचारासाठी सतत काम केले. शेवटी, रिपब्लिकन पक्षाचा निवडणुकीत प्रचार करताना 5 ऑक्टोबर 1968 रोजी त्यांचे निधन झाले. रिपब्लिकन पक्षाचे नेते मौर्य यांच्या सोबत त्यांनी दिल्ली व उत्तरप्रदेशात अनेक सभा प्रचारार्थ राबवल्या. तसेच त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या प्रचारार्थ महाराष्ट्रातील अनेक शहरात 1963 नंतर 1968 पर्यंत कार्य केले आहे.

जोगेंद्रनाथ मंडल हे खरे आंबेडकरवादी म्हणून जगले आणि आंबेडकरी रिपब्लिकन म्हणून कार्यरत असतांना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यू होत असतांना ते रिपब्लिकन पक्षासाठी प्रचार करत होते. ज्याप्रमाणे एक सैनिक आपल्या देशाच्या सुरक्षेच्या लढाईत आपल्या प्राणाची आहुती देतो. त्याचप्रमाणे जोगेंद्रनाथ मंडल यांनी रिपब्लिकन पक्षाचा प्रचार करताना आपले प्राण सोडले. आज त्यागमूर्ती जोगेंद्रनाथ मंडल हे आंबेडकरी रिपब्लिकन म्हणून आपल्या कार्याच्या आणि विचारांच्या रूपाने आपल्यामध्ये जिवंत आहेत. आज 5 ऑक्टोबर 2021ला, 53 व्या जयंती व स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

दिनांक : 5 ऑक्टोबर 2021 *(संशोधित 28 जानेवारी 2022)*

उमेश गजभिये *(आंबेडकरी बौद्ध चळवळ व रिपब्लिकन बुद्धिजीवी संघ)*
जयभीम जयभारत
नमोबुद्धाय

✍️ उमेश गजभिये. मो. 9326887326.

 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 🌷जय✺भिम🌷 🙏 🌷नमो✺बुद्धाय🌷
━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━
Join Us🔛@Chalobuddhkiour
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
  *╚»★ जय भिम ✺ नमो बुद्धाय ★«╝*
            *★जय संविधान★*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...