▣▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▣
⫷◆ समकालीन सहकार्यांच्या आठवणीतील ◆⫸
■ डॉ बाबासाहेब आंबेडकर ■
▣▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▣
°°°【7】°°°
👉🏻३) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाला ना. रा. शेंडे व भाऊसाहेब माडखोलकरांच्या निमंत्रणावरून २ मे १९५४ रोजी भेट दिली. याबद्दलची माहिती ना. रा. शेंडे यांनी 'दलितांचे जग : वेदना व शिष्टाई' या ग्रंथात दिली आहे. आणि साहित्यिकांना उद्देशून केलेले चक्क लांबलचक भाषण बाबासाहेबांच्या तोंडी टाकून दिले आहे. 'विदर्भ साहित्य मंदिरात डॉ. आंबेडकर, नव्हे ज्ञानदेवता' या शिर्षकाखाली ना. रा. शेंडे लिहितात
'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि. २ मे १९५४ रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता विदर्भ साहित्य संघाला मोलाची भेट दिली.
विदर्भ साहित्य संघाची डौलदार व भक्कम वास्तू नुकतीच उभी झाली होती व त्यावेळचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते त्या वास्तूचं नुकतच उद्घाटनही झालं होतं. आणि त्यानंतर वि. सा. संघाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिलीच भेट होती. विश्वमान्य अशा अत्यंत विद्वान व बुद्धिमान साहित्यिकाची राष्ट्रपुरुषाची ती भेट होती. वि. सा. संघात नागपूर नगरीतील सर्व विद्वान साहित्यिकांचा, संशोधकांचा, पत्रपंडितांचा व कायदेपंडिताचा दरबारच भरला होता. तो अविस्मरणीयच प्रसंग! बाबासाहेबांनी प्रवेश करताच टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच त्या उच्चदरबारानं हार्दिक स्वागत केलं; प्रसन्नतेने उत्थापन देऊन त्यांना मानाचा मुजरा दिला. आणि मग डॉ. आंबेडकर, नव्हे ज्ञानदेवता बोलू लागली. भाषण देऊ लागली : “साहित्यकारांनो आणि पंडितांनो,तुमच्या या थोरल्या साहित्य संस्थेला भेट देण्याचा योग आला दोन साहित्यकारांच्या विनंतीनं. एक तुमचा आणि एक आमचा. गजानन माडखोलकर तुमचे, नारायणराव शेंडे आमचे... (दलितांचे जग : वेदना आणि शिष्टाई, श्री. ना. रा. शेंडे यांचे काही निवडक लेखक : काही भाषणे, संपादक - निशिकांत शेंडे, डॉ. वा. ना. मेश्राम, प्रकाशन १५ ऑगस्ट १९६५, पृ. १०४-१०७).
जागाविस्ताराअभावी ना. रा. शेंडे यांनी दिलेले बाबासाहेबांचे हे तथाकथित भाषण येथे पूर्ण देता येत नाही. जिज्ञासूंनी ना. रा. शेंडे यांच्या ग्रंथात ते वाचावे. याबाबत वस्तुस्थिती अशी आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भंडारा मतदारसंघात होणाऱ्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीस उभे होते. ही निवडणूक २.५.५४ व ५.५.५४ रोजी होणार होती त्यानिमित्ताने ते नागपूरला आले होते आणि सिव्हील लाईन्स भागातील माऊंट हॉटेलात ते उतरले होते. तेथे ना. रा. शेंडे व भाऊसाहेब माडखोलकर त्यांना १ मे रोजी भेटले व विदर्भ साहित्य संघाला भेट देण्याची विनंती केली. शेंडे संघाचे सरचिटणीस होते. त्यांच्या विनंतीवरून डॉ. आंबेडकरांनी दुसऱ्या दिवशी (२ मे) दुपारी ४ वाजता भेट देण्याचे मान्य केले. परंतु उपलब्ध पुरावे, साक्ष आणि संदर्भावरून स्पष्ट आहे की, तेथे बाबासाहेब गेले, चर्चा केली पण त्यांनी भाषण केले नव्हते. परंतु शेंडे यांनी “साहित्यकारांनो आणि पंडितांनो' अशी सुरुवात केलेले भाषण बाबासाहेबांच्या तोंडी सरळ सरळ टाकून दिले आहे. हे भाषण वाचल्यावरच लक्षात येते की, असे शब्द वा वाक्यरचना बाबासाहेबांच्या कुठल्याही लिखाणात व भाषणात आढळत नाहीत. उघडच आहे की, ना. रा. शेंडे यांनी स्वत:च तयार केलेले हे भाषण बाबासाहेबांच्या तोंडी घातले आहे. एक शक्यता आहे - चर्चेतील काही मुद्दे त्यात घेतले असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. परंतु बाबासाहेबांनी न केलेले कल्पित भाषण शेंडे यांनी सरळ सरळ ठोकून दिले आहे हे निश्चित. या भाषणाचा समाचार महाराष्ट्र शासनाच्या डॉ. आंबेडकर चरित्रसाधने प्रकाशन समितीचे विशेषाधिकारी दिवंगत वसंत मून यांनी शां. शं. रेगे यांच्या ‘भीमपर्व' या ग्रंथाचे परीक्षण करताना घेतला आहे तो असा
'नागपूरात विदर्भ साहित्य संघाला १९५४च्या मे महिन्यात बाबासाहेबांनी भेट दिली होती. या भेटीत बाबासाहेबांनी फक्त कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती. परंतु बाबासाहेबांनी भाषण दिले, असे सांगून एक कल्पित भाषण श्री. ना. रा. शेंडे यांनी आपल्या १९६५ नंतर प्रसिद्ध झालेल्या 'दलितांचे जग-वेदना व शिष्टाई' या पुस्तकात छापले. बाबासाहेब मराठीत कसे भाषण देतील, हे हेरून श्री. शेंडे यांनी ही रचना केली व ती खरी मानून अनेकांनी त्याची नक्कल केली. याच भाषणातील उतारे श्री. रेगे यांनी बाबासाहेबांच्या साहित्यविषयक दृष्टिकोनाचा पुरावा म्हणून दोनदा उद्धृत केले आहेत. या तथाकथित भाषणासंबंधी बरीच चर्चा झालेली आहे. ना. रा. शेंडे व भाऊसाहेब माडखोलकर यांच्या आमंत्रणावरून बाबासाहेबांनी वि. सा. संघास भेट दिली होती. वि. सा. संघाचे मुखपत्र मासिक 'युगवाणी'त अथवा माडखोलकर संपादित 'तरुण भारता'त बाबासाहेबांनी फक्त कार्यकर्त्यांशी चर्चा केली केली असे वृत्त तत्काली प्रसिद्ध झाले होते.
No comments:
Post a Comment