Friday, 21 January 2022

जंग-ए-आझादी में पठाणोंका किरदार'भारतरत्न' खान अब्दुल गफा़र खान- एक लढवैय्या पठाण..


'सरहद्द गांधी' म्हणजेच भारतरत्न खान अब्दुल गफ़ारखान यांच्या स्मृतीदिनानिमित्त लेख 
'जंग-ए-आझादी में पठाणोंका किरदार
'भारतरत्न' खान अब्दुल गफा़र खान- एक लढवैय्या पठाण... 

भारतातील सत्ताधिशांच्या बेबंद आश्रयामुळे भारतातील बहुसंख्य जनतेस आज हिंदु राष्ट्राची स्वप्ने पडत आहेत. आजच्या कांही कथित देशभक्तांनी हा भारत देश केवळ हिंदुचा असून इतर धर्मिय दुय्यम नागरीक आहेत, असा दुष्प्रचार सुरू केला आहे. पण या भारत भुमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक हिंदू सोबतच अनेक मुस्लिम, शिख धर्मियांनी आपले रक्त सांडले आहे, कारावास भोगला आहे, त्याग केला आहे याची जाणीवही अनेकांना नाही. 

भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले सर्वस्व त्यागले अशा अनेक महान भारतीय सुपुत्रापैकी एक ठळक नाव म्हणजे 'भारतरत्न' खान अब्दुल गफार खान. पेशावरच्या पठाण कुटूंबात जन्मलेले अब्दुल गफार खान यांचे कार्य समस्त भारतीयांनी त्यांच्या बद्दल सदैव ऋणी नि कृतज्ञ रहावे असेच आहे! प्रश्न हा आहे की, आजचा 'न्यू इंडिया' त्यांच्याबद्दल कृतज्ञ न राहता कृतघ्न का झाला आहे?  

भारतरत्न खान अब्दुल गफार खान उपाख्य सरहद गांधी यांचा जन्म पेशावर येथील एका पठाण कुटुंबात ६ फेब्रुवारी १८९० रोजी झाला. पठाण म्हणजे क्षात्रतेज असणारा एक लढवय्या भारतीय समाज. या लढवय्या समाजाने भारतीय स्वातंत्र्यात अतिशय अतुलनीय असे योगदान दिले आहे. पारतंत्र्यात असताना अनेक पठाणांना ब्रिटिशांनी कारावासात टाकले आणि अनेकांना फाशीची सजाही सुनावली. पण पठाण समुदाय डगमगला नाही, तो सतत लढत राहीला. हा समाज लढवय्या तर होताच शिवाय बदललेल्या जगातील परिस्थितीची जाण आणि भान त्याबरेबरच चातुर्य देखील त्यांच्याकडे होते. 

खान अब्दुल गफार खान यांचे आजोबा अब्दुल्ला खान पठाण देखील असेच एक लढवय्ये वीर होते. त्यांनी ब्रिटीशांच्या विरोधात संघर्ष केला. लढाऊ वृत्ती खान अब्दुल गफार खान यांनी त्यांच्या आजोबा कडून शिकली. परंतु त्यांनी अध्यात्मिकता त्यांचे वडील बैरम खान आणि महात्मा गांधी यांच्याकडून प्राप्त केली. खान अब्दुल गफार खान यांनी गांधीजींचे सत्य आणि अहिंसा हे तत्त्वज्ञान स्वीकारले. कारण ते इस्लामचा मूळ अर्थ सत्य,शांतता आणि अहिंसा असून तो गांधीच्या विचारांशी साम्य असणारा आहे असं मानत होते. 

अब्दुल गफार यांचे वडिल बैरम खान यांची अशी इच्छा होती की, अब्दुल गफार खान यांनी आधुनिक शिक्षण घ्यावे. म्हणून त्यांनी त्यांना मिशनरी स्कूल मध्ये भरती केले. त्यावेळी अनेक सनातनी पठाणांनी याचा विरोध केला. परंतु हा विरोध झुगारून अब्दुल गफार खान यांनी मोठ्या हिमतीने आधुनिक आधुनिक शिक्षण घेतले. ही बाब आजही अनेक भारतीय आणि पाकीस्तानी कट्टर मुस्लिम समुदायासाठी खूप मार्गदर्शक अशी आहे.धर्माचरण हे आधुनिक शिक्षण आणि आधुनिक विचार यातील अडथळा बनता कामा नये, हा विचार अब्दुल गफार खान आणि त्यांच्या वडिलांच्या कृतीतून अंगीकारायला हवा हे महत्वाचे! 

मिशनरी स्कूल मधून शिक्षण घेतल्यावर त्यांनी पुढील शिक्षणासाठी अलीगढ हे शहर गाठले. तिथे त्यांच्यावर झालेल्या संस्कारातून या देशातील हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारलेली 'गंगा जमनी तहजीब' हीच देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकेल या विचारातून त्यांनी समाजसेवा करण्यासाठी पुन्हा आपल्या गावी पेशावरला जाऊन समाजसेवा करायची आणि हिंदु मुस्लिम ऐक्याचा हा संदेश सर्वत्र पोचवायचा हे ठरवले.  

पेशावरमध्ये १९१९ मध्ये 'रौलेट मार्शल लॉ' लागू झाला होता.याच काळात खान अब्दुल गफार खान यांनी गांधींचे शिष्यत्व पत्करले आणि खुदाई खिदमतगार या सामाजिक संस्थेची स्थापना केली. या संघटनेचे उद्दिष्ट इश्वराची सेवा हीच जनसेवा या तत्वावर आधारीत होते. गांधींनी ज्या प्रमाणे हिंदुंच्या आध्यत्मिक जाणीवांना प्रबळ करत राजकीय लढा उभा केला. त्याच आधारावर खान यांनी हा प्रयत्न खुदाई खिदमतगार संघटनेच्या माध्यमातून केला. या संघटनेची प्रतिज्ञा खूप बोलकी आहे. ती राजकीय इस्लामपेक्षा अंहिसा अध्यात्मिक तत्वावर आधारलेली होती. "मी कधीही हिंसा करणार नाही, माझ्यावर अन्याय करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीबाबत मनात राग धरून मी त्याच्याशी सुडभावनेने वागणार नाही आणि त्याच्या व्यक्तीस मी माफ करेन" अशी प्रतिज्ञा खुदाई खिदमतगार या संघटनेत घेतली जात असे. बदला घेण्याच्या वृत्तीचे म्हणून प्रसिद्ध असणा-या पठाण समुदयात असा विचार मांडणे, तो रूजवणे आणि लोकांना तो शंभर वर्षापुर्वी अंगिकारायला लावणे ही खरोखरच क्रांतीकारी बाब होती. 

'मार्शल लॉ' च्या त्यांनी विरोधात आंदोलन केले म्हणून ब्रिटिशांनी खान अब्दुल गफार खान यांना अटक करून त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा खटला भरला. या खटल्यात त्यांना सहा महिन्याची सजा झाली. तेंव्हापासून खाऩ अब्दुल गफार खान यांची कारकिर्द गांधीजीचे अनुयायी अशी घडली. टिळक आणि गांधी यांना आपला नेता मानणा-या खान यांनी कॉग्रेसच्या सर्व आंदोलनात सहभाग नोंदवत हिंदु मुस्लिम ऐक्याचा नवा अध्याय घडवला. सी.आर. दास, नेताजी बोस, मोतीलाल नेहरू, पट्टाभी सितरामय्या, हसरत मोहानी आदी नेत्यांबरोबर खान यांनी कार्य केले. 

नेहरू रिपोर्ट आणि पुर्ण स्वातंत्र्याच्या घोषणेनंतर झालेल्या आंदोलनात त्यांनी एक कॉग्रेस सदस्य या स्वरूपात भाग घेतला. कॉग्रेसच्या सर्वच नेत्यांसोबत त्यांना नंतर १९३० साली अब्दुल गफार खान यांना पुन्हा कारावास घडला. हा कारावास अब्दुल गफार खान यांना त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणारा ठरला! या कारावासाच्या काळात त्यांनी कुराणचे पठण करण्याबरोबरच बरोबर शीखांचा धर्मग्रंथ 'गुरु ग्रंथ साहिब' आणि 'भगवद्गीता' यांचेही वाचन केले. कुराण गुरुग्रंथसाहीब आणि भगवद्गीता यांच्या एकत्रित वाचनातून आणि चिंतनातून खान अब्दुल गफार खान यांचे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे एक प्रमुख शिपाई म्हणून व्यक्तिमत्त्व घडले. आजवर घेतलेल्या हिंदु मुस्लिम ऐक्याच्या भुमिकेस एक तत्वचिंतनपर आधार लाभला. त्यांनी त्यांच्या अनुयायांना याच प्रकारे हिंदू-मुस्लिम ऐक्याची ओळख आणि अपरीहार्यता समजून सांगीतली. त्यावेळी त्यांच्यासोबत कारागृहात असणारे अनेक मुस्लीम कैदी त्यांच्या या शिकवणीने प्रभावित झाले आणि त्यांनी महात्मा गांधींचे नेतृत्व मान्य करून देशातील हिंदू मुस्लिम ऐक्य हेच ब्रिटिश अन बरोबरच्या लढाईत प्रमुख आधार असेल हत्यार असेल अशी भूमिका मांडली. पुढे १९३१ साली  
झालेल्या गांधी-आयर्विन करारानंतर खान अब्दुल गफार खान यांची कारागृहातून सुटका झाली. तेव्हापासून खान अब्दुल गफार खान यांनी महात्मा गांधी यांचे शिष्यत्व पत्करून देशातील सामाजिक कार्यात स्वताला झोकून दिले. महात्मा गांधी यांचे शिष्यत्व खान अब्दुल गफार खान यांनी स्विकारल्यानंतर त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू डॉ. जब्बार खान देखील या सामाजिक कार्यात सामील झाले. 

सविनय कायदेभंगाच्या चळवळीत या दोन्ही बंधूंनी योगदान दिल्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना स्थानबद्ध केले आणि पुढे १९३४ मधे त्यांची सुटका झाल्यानंतर खान अब्दुल गफार खान आणि त्यांचे बंधू डॉक्टर खान दोघेही वर्धा येथील गांधीजींच्या आश्रमात राहू लागले. त्यानंतर त्यांनी भारतात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रमुख नेते म्हणून भारतभर दौरे केले ज्यामुळे नंतरच्या कालखंडात ब्रिटिशांच्या विरोधात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला मोठे समर्थन मिळाले. या दोन्ही बंधूंनी १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सहभाग नोंदवला आणि त्यांना पुन्हा अटक झाली. 
त्यानंतर १९४५ साली त्यांची सुटका झाली. 

खान अब्दुल गफार खान हिंदू-मुस्लीम ऐक्याचे आणि त्याचबरोबर अखंड भारताचे खरेखुरे समर्थक! अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी अखंड भारत हेच स्वप्न उराशी बाळगले होते.फाळणीच्या प्रस्तावास विरोध करणारे चारच नेते होते स्वतः महात्मा गांधी खान अब्दुल गफार खान राम मनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण! एका बाजूला बॅ. जीना मुस्लिम लीगच्या माध्यमातून धर्माच्या आधारावर राजकीय उद्दिष्टे साध्य करू इच्छित होते. त्याच वेळी भारतातील हिंदुत्ववादी सुद्धा बॅ. जीना प्रमाणेच हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. अब्दुल गफार खान यांनी बॅ.जीना यांच्या मुस्लिम लीगला आणि सावरकरांच्या हिंदू महासभेला काँग्रेसच्या साथीने कडाडून विरोध केला. वायव्य सरहद्द प्रांतात १९३७ च्या निवडणुकात मुस्लिम लीगला एकही जागा मिळाली नव्हती. परंतु १९४० साली पाकिस्तान निर्मितीची घोषणा केल्यावर मात्र मुस्लिम लीगला वायव्य सरहद्द प्रांत शिरकाव करता आला आणि त्यांना १९४० सालातील निवडणुकात १७ जागा मिळाल्या. परंतु तरीही ३० जागा मिळवून खान अब्दुल गफार खान यांचे बंधू डॉ.जब्बार खान यांच्या नेतृत्वाखाली ते सत्तेत राहीले.

अखंड भारताच्या फाळणीचा प्रस्ताव स्वीकारल्याबद्दल तत्कालीन काँग्रेस नेतृत्वावर 'सत्तेसाठी फाळणी स्वीकारली' असा आरोपही त्यांनी केला. पण ते त्यांच्या हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या आणि अंहिसेच्या तत्त्वापासून मागे हटले नाहीत. फाळणीच्या काळात वायव्य सरहद्द प्रांतात झालेल्या हिंसे दरम्यान खान अब्दुल गफार खान यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी अनेक हिंदूंचे आणि शिखांचे प्राण वाचवले.

देशाची फाळणी हा त्यांच्यासाठी खूप मोठा आघात होता. कारण स्वातंत्र्यपूर्व कालखंडात खान अब्दुल गफार खान यांनी सातत्याने बॅरिस्टर महंमद अली जिना आणि त्यांचा पक्ष मुस्लिम यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. परंतु फाळणीनंतर 'पख्तुनीस्तान' म्हणजेच वायव्य दिशेकडील अखंड भारताचा प्रांत हा स्वाभाविकपणे पाकिस्तानात सामील करणे अपरिहार्य बनले. त्यामुळे खान अब्दुल गफार खान यांच्याबद्दल पाकिस्तानच्या सत्ताधिशांना कायमस्वरूपी तिरस्कार वाटत राहिला. फाळणी बद्दल अनेक मतमतांतरे असली तरीही, हा भारत देश अखंड राहील आणि हिंदू मुस्लिम ऐक्य टिकेल, या हेतूने तन्मयतेने काम करणाऱ्या खान अब्दुल गफार खान यांना फाळणी ही खूप मोठा धोका या स्वरूपात अनुभवायला मिळाली. 

खान अब्दुल गफार खान १९६९ गांधी जन्मशताब्दीच्या निमित्ताने भारतात आले. तेव्हा त्यांनी भारतीय संसदेला उद्देशून केलेल्या भाषणात 'भारत ज्याप्रमाणे बुद्ध यांना विसरला त्याच प्रमाणे तो गांधींनाही विसरत आहे' अशी खंत व्यक्त केली होती. भारताच्या फाळणीस स्विकारल्या बद्दल त्यांनी भारतातील नेत्यांना उद्देशून उद्विग्न पणे असे वक्तव्यही केले की, "तुम्ही फाळणी करून, आम्हाला कोल्हे लांडगे यांच्या हवाली केले आहे". त्यांचे हे वक्तव्य तंतोतंत खरे होते. अखेरपर्यंत त्यांनी कधीही फाऴणी स्वीकारली नाही. कारण पाकिस्तानची निर्मिती आणि पाकिस्तानच्या निर्मितीचे उद्दिष्ट याच्याशी खान अब्दुल गफार खान यांनी कधीही समर्थन केले नव्हते. फाळणीनंतर त्यांनी पाकिस्तानमधे पाकिस्तान पासून 'स्वतंत्र पख्तुनीस्थान' निर्माण करण्याचे आंदोलन चालू ठेवले. ज्यास यश मिळालेच नाही.  

भारत हा आपला देश धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक संसदीय लोकशाहीवर उभा राहिला. पण त्यात आपण खान अब्दुल गफार खान यांना सामील करून घेऊ शकलो नाही ही खुप मोठी खंत आजच्या भारतासाठी सदोदित सलनारी आहे. 

अखिल भारतीय काँग्रेस बद्दल आणि अखंड भारत भारताबद्दल सातत्याने सकारात्मक भूमिका घेणाऱ्या खान अब्दुल गफार खान यांचा पाकिस्तान मध्ये छळ झाला हे वेगळे सांगायला नको. कारण पाकिस्तानी सत्ताधीशांनी त्यांना अनेक वर्ष तुरूंगात टाकले आणि आयुष्यातील काही काळ त्यांना अफगाणिस्तानमध्ये अतिशय कठीण परिस्थितीत व्यतीत करावा लागला. 

गांधी जन्मशताब्दी सोहळ्यानंतर ते १९८५ साली पुन्हा भारतात आले. कारण होते काँग्रेसचा शतकपूर्ती महोत्सव. यावेळीही ते भारतात आकर्षणाचे प्रमुख केंद्र होते. भारतीय जनतेने त्यांना सतत भारताचा सुपुत्र मानून प्रेम केले. त्यांचे आत्मचरित्र ' My life and Strugle' हे त्यांची उद्विग्ता आणि भारतीयांबद्दलची आत्मियता समजण्यासाठी मुळातून वाचण्यासारखे आहे. भारतातून परतल्यावर दोनच वर्षांनी १९८७ साली पाकिस्तानी सरकारने त्यांना पेशावरमध्ये स्थानबद्ध केले आणि तिथेच २० जानेवारी १९८८ रोजी त्यांचा मृत्यू झाला. ऐतिहासिक पुरावे नाहीत पण असे म्हटले जाते की त्यांना भारतात दफन व्हायचे होते पण त्यांच्या अनुयायांनी त्यांना अफगाणिस्तानातील जलालाबाद तिथे दफन केले!  

भारत सरकारने १९८८ साली त्यांना 'भारतरत्न' हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. भारतरत्न हा सन्मान मिळवणाऱ्या अनेक महान नेत्यांच्या यादीत खान अब्दुल गफार खान हे पाकिस्तानी नागरिक आहेत याचा अनेक आजकालच्या कथित देशभक्तांना पत्ताही नसेल!

हिंदू-मुस्लीम ऐक्याचे एक प्रमुख नेते, अखंड भारताचे कडवे समर्थक आणि गांधीजींचे शिष्य म्हणून जगाला खान अब्दुल गफार खान यांची आजची ओळख आहे. गांधीजींना पण 'राष्ट्रपिता' म्हणतो अगदी त्याच धर्तीवर खान अब्दुल गफार खान यांना भारतीय जनतेने तेच मानाचे स्थान दिले आणि त्यांचा 'सरहद्द गांधी' असा त्यांचा सन्मान केला. पण तरीही खान अब्दुल गफार खान यांनी मांडलेली खंत आणि अखंड भारताची त्यांची मागणी वा ईच्छा, ही प्रत्येक भारतीयासाठी सदैव एक मोठा प्रश्न म्हणून सर्व भारतीयांना सलत राहील. 

© राज कुलकर्णी.

{ हा लेख बीड येथे ६ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रकाशित झालेल्या 'जंग-ए-आझादी में पठाणोंका किरदार ' या ग्रंथात प्रकाशित झालेला आहे}

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...