📚 *गालिब*
चांगला लांब कुर्ता, ढगळा पायजमा, डोक्यावर उंच टोपी आणि पायात चर्र चर्र करणारी मोजडी हा असा पेहेराव होता दिल्ली दरबाराच्या शाही शायरचा, मिर्जा असदउल्लाह खां गालिबचा. गालिब हा त्यांच्या नावाचा भाग नाहीये तर गालिब ही उर्दू शायरीतली एक उंची आहे, जी गाठण्यासाठी उर्दूतले शायर फार प्रयत्नशील असायचे, आजही आहेत.
*आज या गालिबचा जन्मदिवस.*
या गालिबला गालिब नाही तर इतर कुठलीही उपाधी असूदेत सहजासहजी मिळाली नाहीच. शेवटचा मुघल बादशाह बहादूर शाह जफर याच्या कृपेने गालिबला उर्दू शायरीतल्या तीन महत्त्वाच्या उपाधी मिळू शकल्या कारण हा बादशाह स्वतः एक शायर होता, त्यामुळे शायर लोकांची चांगली वाईट ओळख पटवणं त्याला शक्य होतं आणि तो ते करत असे. या शेवटच्या बादशहाच्या दरबारातले गालिब हे एक अतिशय महत्त्वाचे दरबारी होते. त्यांच्यावर दरबारातल्या काही महत्वाच्या जबाबदार्या तर होत्याच पण त्याशिवाय बादशाहने आपल्या मुलाचे शिक्षक म्हणूनही गालिब यांची नियुक्ती केली होती.
गालिब ४-५ वर्षांचेच असतील तेव्हा त्यांचे वडील वारले, काका आणि आजोबा यांनी गालिब यांना लहानाचं मोठं केलं. त्या काळी गालिब यांची आई चांगली शिकलेली होती पण घरच्या परिस्थितीमुळे गालिब यांचं शिक्षण घरीच झालं आणि त्यामुळे ते फारसं चांगलं व नियमित होऊ शकलं नाही. गालिबचे पूर्वज बर्याच ठिकाणी स्थलांतर करत करत भारतात आले होते त्यामुळे गालिबला फारसी ही भाषा यायची, लहान वयातच प्रयत्नपूर्वक ही भाषा त्यांनी पक्कीही केली. गालिब ज्या भागात रहायचे तो भाग मोठमोठ्या शायर लोकांचा भाग होता आणि नकळत हेच संस्कार गालिब यांच्यावर झाले. अगदी लहान वयातच गालिब नज्म, शेर लिहू लागले पण ते ही फारसी भाषेत.
ते तखल्लुस ही पदवी किंवा उपाधी लावून शेर लिहीत, नंतर याची जागा गालिब या उपाधीने घेतली. त्यांची एक सवय होती, ते शेर रचत आणि आपल्या कपड्यांना गाठ बांधत आणि नंतर एकेक गाठ सोडून सगळे शेर लिहून काढत.
वयाच्या १३ व्या वर्षीच गालिब यांचं लग्न झालं. घरची गरिबीच पण दारू आणि झुगार यांचा नाद गालिबने कधीही सोडला नाही. हातात पैसे आले की ते मेरठची दारू आणत, या मेरठच्या दारूचे गालिब अक्षरशः वेडे होते. दारूच्या रिकाम्या बाटल्याही ते शक्यतो फेकत नसत. या नादापायी ते बर्याचदा लोकांकडून पैसे उधारही घेत.
ज्याप्रमाणे आपण विचार करतो त्याप्रमाणे गालिबही विचार करत असत पण तो विचार ते नज़्ममध्ये करत असत. त्यांच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगावर बहुतेक करून गालिब यांनी नज़्म लिहिली आहे आणि त्याच नज़्म लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. आपल्याला अपत्य नाही हे दुःख गालिब यांच्या मनात खूप खोलवर जाऊन बसलं होतं. त्यांची सातीच्या साती अपत्ये जगली नाहीत आणि या आपल्या दुःखाला त्यांनी वाट मोकळी करून दिली आपल्या नज़्मच्या वाटे. त्यांच्या दुःखी रचना या बहुतेक करून याच दुःखात रचलेल्या आहेत. त्यातलीच एक रचना फार लोकप्रिय आहे -
हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमां, लेकिन फिर भी कम निकले
गालिब यांचा धर्माशी कधीही संबंध आला नाही. ते कधीही मशिदीत गेले नाहीत की कधी नमाज़ पढली नाही. त्यांच्यासाठी धर्म नाही तर तो समोरचा माणूस महत्त्वाचा असायचा. जुन्या दिल्लीत गालिबचे काही किस्से प्रसिद्ध आहेत. त्यातलाच हा एक किस्सा. एकदा एका दिवाळीत मिर्झा गालिब त्यांच्या एका हिंदू मित्राच्या घरी गेले होते. दिवाळीची पूजा झाली आणि भटजींनी सगळ्यांना कपाळावर कुंकूने टिळा लावला पण गालिब यांना मात्र त्यांनी वगळलं. आपल्यालाच फक्त वगळलेलं पाहून गालिब त्या भटजींना म्हणाले की मलाही टिळा लावा. त्या दिवशी त्यांनी दिवाळीच्या पूजेचा प्रसाद घेतला आणि घरी जायला निघाले. कपाळावर लावलेला टिळा आणि हातातली मिठाई बघून रस्त्यातच एका मुसलमानाने यावर आक्षेप घेतला आणि तो म्हणाला की, "मिर्झा, दिवाळीची मिठाई खाणार, अल्लाहला कसं तोंड दाखवणार ?" यावर मिर्झा यांनी उत्तर दिलं, "जर बर्फी हिंदू आहे तर काय इमरती मुस्लिम आहे !" त्यांच्यासाठी धर्म नाही तर समोरचा माणूस महत्वाचा होता म्हणूनच त्यांनी दिवाळीचा टिळा लावून घेतला आणि तसेच टिळा लावूनच ते घरीही परतले.
मिर्झा गालिब यांना भारत आणि पाकिस्तानात महत्वाचं स्थान आहे. इंग्रजांच्या राजवटीत देशाची स्थिती बघून दुःखी झालेल्या गालिब यांनी आपल्या भावना नज़्म लिहून व्यक्त केल्या. आग्रा, दिल्ली, जयपूर आणि कलकत्ता या भागात आपलं आयुष्य घालवणाऱ्या गालिब यांच्या उर्दू गझल आवडीने ऐकणार्यांची संख्या आजही खूप मोठी आहे. उर्दू शायरीत मिर्झा गालिब यांना सर्वोच्च मानलं जातं. स्वतःबद्दल लिहिताना गालिब म्हणतात, "दुनिया में यूं तो बहुत से अच्छे कवि-शायर हैं, लेकिन उनकी शैली सबसे निराली है."
खरं तर माझा आणि नज़्म, शेरो शायरीचा फारसा संबंध नाही पण काही उर्दू कवींच्या रचना मला आवडतात आणि त्यातले मिर्झा गालिब खासच. या खास असणार्या गालिबसाठी त्यांच्यावर पोस्ट लिहिण्याचा हा एक छोटासा प्रयत्न केला.
No comments:
Post a Comment