॥व्यक्तिरेखा॥२॥
खुदा का सच्चा बंदा : अशफ़ाक़उल्ला खान
तीसचं दशक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील अत्यंत धामधुमीचं दशक. गांधीजीं सविनय कायदेभंगाच्या तयारीत व्यस्त होते, तर नुसत्या अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळणं अशक्य आहे, अशी विचारधारा असलेला तरुण वर्ग, सशस्र क्रांतीकडे आकर्षित होऊ लागला होता.
अहिंसक आंदोलनात हिरीरीने भाग घेणारे मुस्लिम तरुण मात्र, सशस्र क्रांतीपासून चार हात दूरच होते. नेमकी हीच गोष्ट मुस्लिम विरोधकांना, मुस्लिमांच्या मर्मावर बोट ठेवण्यासाठी पुरेशी होती.
काकोरी कटाचे मुख्य सूत्रधार थोर क्रांतिकारक रामप्रसाद 'बिस्मिल' हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे कट्टर समर्थक होते. मुस्लिम समाजाच्या देशभक्तीविषयी घेतल्या जाणाऱ्या शंकेमुळे, त्यांना असह्य वेदना होत. परिणामी सशस्त्र क्रांतीकडे मुस्लिम तरुणांचं मन वळवण्यासाठी ते प्रयत्नशील होते. या प्रयत्नात त्यांना गवसलेलं अमूल्य रत्न म्हणजे, अशफ़ाक़ उल्ला खान !
अशफाक़ उल्ला खान म्हणजे रामप्रसाद 'बिस्मिल' यांचा उजवा हातच! रामप्रसादांच्या खांद्याला खांदा लावून ते काकोरी कटात सहभागी झाले. या कटातील सहभागामुळे रामप्रसाद 'बिस्मिल', अशफाक उल्ला खान आणि ठाकूर रोशनसिंह या तिघा क्रातीविरांना फाशीची शिक्षा झाली. १९ डिसेंबर १९२७ रोजी त्यांना फाशी देण्यात आले.
रामप्रसाद 'बिस्मिल' व अशफाक़ उल्ला खान हे दोन्ही मित्र शायरही होते. रामप्रसाद 'बिस्मिल' या टोपणनावाने तर अशफाक़ उल्ला खान हे 'हसरत' व 'वारसी' या टोपणनावाने शायरी करीत.
रामप्रसाद 'बिस्मिल'नी बलिदानानंतरही मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी पुनर्जन्म घेण्याचा संकल्प केला होता. हिंदू धर्माप्रमाणे मुस्लिम धर्मात पुनर्जन्माची संकल्पना नसल्यामुळे अशफाक़ उल्ला खान खंतावले. आपली खंत काव्यातून व्यक्त करताना त्यांनी लिहिलं,
जाऊँगा खाली हाथ मगर ये दर्द साथ ही जायेगा,
जाने किस दिन हिन्दोस्तान आज़ाद वतन कहलायेगा?
बिस्मिल हिन्दू हैं कहते हैं "फिर आऊँगा,फिर आऊँगा,
फिर आकर के ऐ भारत माँ तुझको आज़ाद कराऊँगा!”.
जी करता है मैं भी कह दूँ पर मजहब से बंध जाता हूँ,
मैं मुसलमान हूँ पुनर्जन्म की बात नहीं कर पाता हूँ।
हाँ खुदा अगर मिल गया कहीं अपनी झोली फैला दूँगा,
और जन्नत के बदले उससे एक पुनर्जन्म ही माँगूंगा!
अशफ़ाक उल्ला खान यांचे हे उदात्त विचार वाचून मन नतमस्तक होते. तर हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडणाऱ्या लोकांच्या कोत्यापणा पाहून मान शरमेने खाली झुकते.
कूटनीतिचा भाग म्हणून रामप्रसाद यांनी अशफ़ाक उल्ला खान यांना प्रिव्ही कौंसीलकडे माफीनामा देण्यास सांगितले होते. त्याला ते अजिबात तयार नव्हते. रामप्रसादांच्या इच्छेखातर त्यांनी तो दिला पण अतिशय बाणेदारपणे ते म्हणाले होते, "बंदा खुदा के सीवा किसीसे माफी मांगना हराम समझता है." प्रिव्ही कौंसीलने तो माफीनामा फेटाळल्यामुळे, कूटनीति तर सफल झाली नाही, पण अशफाक उल्ला खान यांचं, आपण ईमान पणाला लावलं, याचं शल्य मात्र रामप्रसाद 'बिस्मिल' यांना अखेर पर्यंत बोचत राहिलं.
फाशी जाण्याच्या प्रभाती पवित्र कुराणाची प्रत काखेत घेऊन एखाद्या हज यात्रेकरुच्या थाटात अशफ़ाक उल्ला खान फाशीच्या तख्ताच्या दिशेने मोठ्या रुबाबात चालत गेले. फासाचे चुंबन घेऊन त्यांनी अल्लाची प्रार्थना केली. हिंदू - मुस्लिमांना एकजूटीने स्वातंत्र्यलढा लढण्याचं अपिल केलं. आणि देशातल्या सात कोटी मुसलमानांपैकी मी पहिला मुसलमान आहे, जो देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर चढत आहे, अशी कृतार्थता व्यक्त करून ते फाशी गेले.
अशफ़ाक उल्ला खान यांचा मृतदेह मालगाडीच्या डब्यातून शाहजहाँपूर या त्यांच्या गावी नेण्यात आला. दहा तासांनंतरही त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज नि प्रसन्नता लोप पावली नव्हती.
रामप्रसादांचं हिंदू-मुस्लिम ऐक्याचं स्वप्न साकार झालं होतं. फासावर जाण्यापूर्वी ते म्हणाले होते- "अशफाक ! तू माझी आणि देशातील सर्व मुसलमानांची लाज राखली. हिंदू युवकांप्रमाणे मुस्लिम युवकही देशासाठी हिरीरीने प्राणार्पण करू शकतो हे मला दाखवून द्यायचं होतं. मुसलमानांवर विश्वास टाकता येणार नाही असं म्हणण्याचं आता, कुणालाही धाडस होणार नाही."
हिंदू-मुस्लिम क्रांतीविरांची ही जोडी हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक बनून अजरामर झाली. काकोरी कटातील हुतात्म्यांच्या आजच्या स्मृतीदिनी त्यांच्या स्मृतींना कोटी कोटी प्रणाम....
No comments:
Post a Comment