पुस्तक: राजश्री शाहू महाराज आणि वेदोक्त प्रकरण
लेखक: उत्तम कांबळे
प्रकाशक: सुगावा प्रकाशन, पुणे
(+91 96893 57837)
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे धार्मिक वृत्तीचे होते. सर्व प्रकारचे धार्मिक व्यवहार ते नित्य नेमाने करत असत. कार्तिक स्नानासाठी ते पंचगंगा नदीत जात असत. त्यांच्याबरोबर मंत्र म्हणणारा त्यांचा पुरोहितही असे. महाराज धर्मभोळे मात्र नव्हते. कर्मकांडाच्या ओंजळीने पाणी पिणारे नव्हते.
१९०० सालात ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या (राजर्षी शाहू स्मारक ग्रंथात हे साल १८९९ असल्याचे म्हटले आहे.) महिन्यात पवित्र स्नान घेण्यासाठी ते पंचगंगेच्या घाटावर गेले. राजघराण्याचे पुरोहित नारायणराव राजोपाध्ये मंत्र म्हणण्यासाठी घाटावर होते. महाराज स्नानासाठी नदीपात्रात उतरले तेव्हा त्यांच्याबरोबर संस्कृत आणि वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक राजाराम शास्त्री-भागवत, महाराजांचे बंधू श्रीमंत बापूसाहेब घाटगे- -कागल, मेहुणे मामासाहेब खानविलकरही होते महाराजांचे स्नान सुरू झाल्यानंतर राजोपाध्ये यांनी मंत्रपठण करण्यास सुरुवात केली. ते वेदोक्त मंत्र म्हणण्याऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणताहेत हे भागवतशास्त्री, घाटगे आदींच्या लक्षात आले. क्षत्रिय राजासाठी वेदोक्त मंत्र म्हणण्याची आवश्यकता होती, पण राजोपाध्ये दुसरेच मंत्र म्हणत होते. राजाच्या स्नानावेळी मंत्रपठण करणाऱ्या पुरोहिताने स्वतः अगोदर स्नान करणे आवश्यक असते, पण राजोपाध्ये आंघोळ न करता मंत्रपठण करताहेत, ही गोष्टही भागवतशास्त्रींसह सर्वांच्या लक्षात आली. महाराजांना ही माहिती देण्यात आली.
महाराज म्हणाले, "अहो राजोपाध्ये, तुम्ही वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र का म्हणता आहात?"
*राजोपाध्ये - “वेदोक्त मंत्राची शूद्रांना गरज नसते, म्हणून मी पुराणोक्त म्हणतोय." (याचा अर्थ ब्राह्मण मराठ्यांना शूद्र समजत होते.)*
महाराज - "आपण स्नान न करता मंत्र म्हणताहात.
राजोपाध्ये - “होय. कारण शूद्रांसाठी मंत्रोच्चार करताना पुरोहिताने अगोदर स्नान करण्याची गरज नसते."
राजोपाध्ये यांचे उत्तर ऐकून पंचवीस वर्षांच्या तरण्याबांड राजाला धक्का न बसल्यासच नवल म्हणावे लागेल. महाराज प्रचंड संतापले होते. राजघराण्याचे पुरोहित म्हणून महाराजांनीच राजोपाध्ये यांची नेमणूक केली होती. खऱ्या अर्थाने ते त्यांचे नोकर होते. राजघराण्याचे नोकर होते. राजोपाध्येंना वार्षिक २० हजार रुपये मिळवून देईल इतके इनाम आणि वतन होते. १९०० सालातील वीस हजार रुपयांची आज किती किंमत होईल, याचा विचार करावा. या वार्षिक २०हजार रुपयांशिवाय राजघराण्यात नित्य पूजा करतानाही काही रक्कम मिळत असे. वर्षाला अंदाजे एक हजार रुपये मिळायचे.
राजोपायेंना पुरोहित म्हणून तर दर्जा होताच, शिवाय संस्थानच्या सरदाराप्रमाणेही त्यांना दर्जा दिला गेला होता. आपल्या वतनक्षेत्रात ते न्यायदानाचे कामही करू शकत. दिवाणी आणि फौजदारी खटल्याचा निवाडा ते देऊ शकत. राजघराण्यात ते प्रतिष्ठित म्हणून ओळखले जात. सर्व महत्त्वाच्या सभा-समारंभांना त्यांची हजेरी असे.
वेदोक्त मंत्र म्हणण्यास उघडपणे आणि उद्धटपणे नकार देणाऱ्या राजोपाध्ये यांच्याविषयी महाराजांना प्रचंड चीड आली, पण त्यांनी आपला संयम ढळू दिला नाही. खेदाने पण शांतपणे त्यांनी ही घटना स्वीकारली. महाराजांमधील धार्मिक बंडखोराचा जन्म येथेच झाला. त्यामुळे राजोपाध्ये यांना पुरोहित पदावरून कमी करण्याचा निर्णय झाल्यानंतर तसे पत्र पाठविण्यात आले. राजोपाध्ये यांच्याविषयी निर्णय घेताना महाराजांनी कुठेही आपला संयम ढळू दिला नाही. भावनेच्या भरात त्यांनी निर्णय घेतला नाही. संस्थानात उपलब्ध असलेले कायदे, परंपरा, रिवाज याचा त्यांनी वापर केला. दरबाराने घेतलेला हा निर्णय पोलिटिकल एजंटामार्फत मुंबई सरकारकडे पाठवण्यात आला. त्यांनी या निर्णयाला मान्यता दिली.
म्हणून *महाराजांच्या विरोधात आरोप, शिवीगाळ, शाप, राग, क्रोध, संशय, धमक्या आदी सर्व आयुधे ब्राम्हण वर्गाकडून मोठ्या प्रमाणात वापरली जात होती.* (यालाच ब्राह्मणांची उच्च संस्कृती म्हणतात बरं!) ही सर्व वादळे अंगावर झेलत महाराज एखाद्या पर्वताप्रमाणे धीर-गंभीर उभे होते. सरळ मार्गाने उत्तर देत होते. काही वेळा व्यथित होऊन इंग्रज अधिकाऱ्यांना पत्रही लिहीत होते. धर्माच्या आधाराने एका महाराजांना नामोहरम करण्याचा प्रयत्न कसा होऊ शकतो, हे उभा देश पहात होता. सिंहासनावरच्या महाराजांना इतका त्रास होतो, तर सर्वसामान्यांना पुरोहितशाहीचा किती त्रास होत असेल, असा प्रश्नही महाराजांच्या मनात निर्माण होत होता. पण प्रश्न होता तो महाराज म्हणून त्यांना लाभलेल्या प्रतिष्ठेचा, *प्रश्न होता तो पुरोहितशाहीने चालवलेल्या मनमानीचा, प्रश्न होता तो धर्माच्या नावाखाली कोणालाही खलास करण्याच्या वृत्तीचा... धर्माच्या नावाने सारेच आपल्या पंजाखाली घेणाऱ्या आणि स्वतः वगळता सारी दुनिया शूद्र ठरवणाऱ्या वृत्तीचा. ब्राम्हण समाज फक्त क्षत्रिय असलेल्या महाराजांनाच शूद्र ठरवत नव्हता, तर महाराजांना मदत करणाऱ्या सेवेकरी, जोशी या आपल्या ज्ञातीबांधवानाही बहिष्कृत करून शूद्र ठरवत होता. अशाप्रकारे वेदोक्त प्रकरण महाराष्ट्राच्या इतिहासात अतिशय क्लेशदायक होते. मूठभर मंडळी धर्माच्या जोरावर राजसत्ता कशी जेरीस आणतात, हे महाराष्ट्राने पुन्हा एकदा पाहिले.*
लोकमान्य टिळकांनी पाठिंबा दिलेले राजोपाध्ये सर्व कायदेशीर रित्या केलेल्या काज्जेदलालीतून हरल्यानंतर या प्रकरणाच्या शेवटी शेवटी का होईना, पुरोहितशाहीने आक्रमकपणे टाकलेली पावले तिला मागे घ्यावी लागली. पण या निमित्ताने महाराजांनीच नव्हे तर सर्वसामान्य समाजानेही पुरोहितशाहीची एकाधिकारशाही पुन्हा एकदा जवळून पाहिली.(पृष्ठ क्र.१०,११,२२,२८)
No comments:
Post a Comment