Saturday, 11 December 2021

विजीगिषू मायकल फॅरेडे-✍️डावकिनाचा रीच्या

विजीगिषू मायकल फॅरेडे
-✍️डावकिनाचा रीच्या 


न्यूटननंतर आणि आइन्स्टाइनच्या आधी असा मधल्या काळात मायकेल फेरेडे यांचा जन्म झाला.. त्याची आत्मकथा ही अतिशय रोमांचकारी तसेच प्रेरणा दायी आहे. मनात इच्छा असेल तर व्यक्ती सर्व कुंपण तोडून आपले ध्येय कसे गाठू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे मायकल फॅरेडे…

२२ सप्टेंबर १७९१ रोजी जेम्स फॅरेडे नावाच्या लोहाराच्या घरात मायकल जन्माला आला. चार भावंडात याचा नंबर तिसरा. इंग्लंड मधील वेस्टमोरलंड प्रांतातील ऑथगिल नावाच्या छोट्या खेड्यात यांच्या कुटुंबाची जेमतेम गुजराण होत होती. चारही भावात सर्वात जास्त शाळा मायकल शिकला.. मात्र दहाव्या वर्षी त्याने पण शाळा सोडून दिली. शाळा सोडल्याचा किस्सा धमाल आहे..  

शाळेत असताना त्याला र उच्चारता येत नव्हता...मात्र शिक्षिकेला वाटले तो तिची टिंगल उडवतो आहे.. त्याला शिक्षा दिली.. भाऊचा हा शाळेचा शेवटचा दिवस. मग परत कधी शाळेचे तोंड पाहिले नाही. वयाच्या अकराव्या वर्षापासून कामाला लागला.. बुक बायंडींगचे काम भेटले. तिथेच काम करत वाचनाची गोडी लागली.. ती त्याने काळजीपूर्वक जोपासली. त्याचे हे वाचनाचे वेड पाहून एका मित्राने त्याला रॉयल इन्स्टिट्यूट, लंडन मध्ये होणाऱ्या वैज्ञानिक प्रदर्शनाचा पास मिळवून दिला.रॉयल इन्स्टिट्यूटचा संचालक रसायनशास्त्रज्ञ हम्फ्री डेव्ही याचं तिथं सप्रयोग व्याख्यान होतं.

त्या वेळी डेव्ही खूप लोकप्रिय होता. त्याचे प्रयोग पाहण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करायचे. त्या दिवशी आकाशात असणाऱ्या विजेवरील संशोधनावर डेव्ही बोलला. त्याचं व्याख्यान ऐकून प्रभावित झालेल्या फॅरेडेने त्या व्याख्यानाची टिप्पणं व प्रयोगाची चित्र काढली. त्या सर्व हस्तलिखितची बांधणी करून त्याचं एक पुस्तक तयार केलं. तो डेव्हीला देवून आला. मात्र डेव्हीने त्याची तेव्हा दखल घेतली नाही. 

काही वर्षानी प्रयोगशाळेत रासायनिक स्फोट झाल्याने डेव्ही अंध झाला. परिणामी हुशार मदतनीसाची गरज भासू लागल्याने, त्याने फॅरेडेची सहाय्यक म्हणून नियुक्ती केली. प्रयोगशाळेची सफाई करताना, फॅरेडेच्या प्रयोगकार्याचन निरीक्षण करत, अभ्यास करत, विज्ञान क्षेत्रात त्याने आगेकूच केली.

एके दिवशी डेव्ही हा आपला सहकारी विल्यम वॉलस्टॉन याच्यासमवेत ‘विद्युत चुंबकतत्त्वावर’ प्रायोगिक संशोधन करताना, विद्युतप्रवाह सोडलेली तार चुंबकाप्रमाणे का कार्य करते? याचा शोध घेत होता. दिवस वाया चालले होते, पण उत्तर सापडत नव्हते. वैतागून फॅरेडेला डेव्ही फॅरेडेला उपरोधाने म्हणाला, साफसफाई करून झाल्यावर तू पण एकदा प्रयोग करून बघ.

पडत्या फळाची आज्ञा.. काही दिवसात, फॅरेडेने डेव्हीच्या प्रश्नाचं उत्तर तर शोधलंच, पण त्याही तो पुढे गेला. ‘यांत्रिकी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होतं.’ या तत्त्वावर आधारलेली त्याने पहिली ‘इंडक्शनमोटर’ तयार केली. या उपकरणाचा वापर करून पंखा, शिवणयंत्र, चारचाकी, आगगाडी, विमान ही प्रगत साधने आज तयार केली जातात. फॅरेडे आता लंडन मध्ये electric boy म्हणून ओळखला जाऊ लागला 

या शिष्याच्या पराक्रमावर डेव्ही खूश होण्याऐवजी जळू लागला. लोक आता म्हणू लागले की डेव्हीचा सगळ्यात मोठा शोध म्हणजे "या फॅरेडेला जगासमोर आणणं" हाच आहे. फॅरेडेला दूर करण्यासाठी त्याने एक युक्ती योजली. बव्हेरियम काचेपासून दूरदर्शक दुर्बीण (टेलिस्कोप) व सुक्ष्मदर्शक (मायक्रोस्कोप) केली जायची. त्या काचेतील घटक शोधण्याची जबाबदारी डेव्हीने फॅरेडेवर सोपवली. हे काम तो यशस्वी करू शकेल असे मनातून डेव्हीला वाटत नव्हतंच. थोडक्‍यात हमखास अपयश येणाऱ्या लढाईचे सूत्र त्याने मायकल फॅरेडेला दिलं

झालं पण तसंच. फॅरेडेने चिकाटीने चार वर्षे काम करूनही त्याला काचेच्या तुकडय़ातील घटक शोधता आले नाहीत. शेवटी त्याने बनवलेला काचेचा तुकडा आठवण म्हणून त्याने कपाटात जपून ठेवला.

१८२९ साली, डेव्हीच्या झालेल्या मृत्यूनंतर फॅरेडे हा प्रयोगशाळेचे प्रमुख झाला. आता त्याला अडवायला कोणीच नव्हतं. त्याने लोकांना थक्क करून टाकणारे प्रयोग दाखवायला सुरुवात केली. प्रयोग कसला...तर स्वतच्या अंगातून विद्युतधारा खेळवून बोटाने गॅस पेटवणे. आपण आता दोनशे वर्षानंतर देखील धाडस करू शकणार नाही. 

गतिमान चुंबक हा विद्युतप्रवाह निर्माण करतो, यातूनच त्याने विद्युज्जनित्राचा(इलेक्ट्रिक मोटर) शोध लावला. परिणामी भौतिकशास्त्रात फॅरेडेचं नाव कायमचं नोंदलं गेलं. १८४०च्या सुमारास फॅरेडेला विस्मरणाचा विकार जडला. तरी चिकाटीने त्याने संशोधन चालू ठेवले. ‘प्रकाशाचा विद्युतचुंबकत्त्वाशी असलेला संबंध’ त्याला शोधायचा होता. या संशोधनात सर्व मूलद्रव्य, रसायने वापरून त्याला यश येत नव्हते. गम्मत म्हणून त्याने तो बहेरियन काचेचा तुकडा वापरून पाहिला. आणि प्रयोग यशस्वी.

चुंबकसान्निध्यात प्रकाश भिन्न दिशांनी न विखुरता, एकतरंगी होऊन एका दिशेने जातो’ हे सिद्ध केले आणि ‘ध्रुवीकरण’ (पोलनायझेशन) या संकल्पनेचा जन्म झाला.

विद्युत शक्तीचे प्रयोग लोकांना पटले होते मात्र पृथ्वीच्या चुंबकीय शक्ती या संकल्पनेवर लोक विश्वास ठेवेनात. शिक्षण झालं नसल्याने लोकांना अपेक्षित असलेले गणितीय समीकरण याला मांडता येईना. नैराश्याबरोबर जूना विस्मरणाचा त्रास पुन्हा उफाळून आला. मात्र त्याच्या मदतीला एक तरुण गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ धावून आला...... जेम्स मॅक्सवेल.

‘लोहकिसाजवळ चुंबक नेल्यामुळे त्या किसाची वर्तुळाकार नक्षी तयार होते.’ हे निरीक्षण मॅक्सवेलने मांडलेल्या समीकरणाच्या आधारे फॅरेडेने सचित्र व सोदाहरण स्पष्ट केले.. आज आपण वापरत असलेल्या जवळ जवळ प्रत्येक उपकरणात विद्युत आणि चुंबक याचा वापर आहे.. ज्याचे श्रेय या गरीब घरात जमलेल्या आणि शाळा न शिकलेल्या वल्लीकडे जाते.

वय वाढत गेलं तसा मायकल फॅरेडे खूपच प्रसिद्ध झाला आणि लोकांच्या त्याच्याकडून अपेक्षा देखील वाढल्या. १८५३ साली सुरू झालेल्या क्रिमियन वॉर मध्ये त्याने रासायनिक बॉम्ब बनवावे अशी सरकारची अपेक्षा होती. मात्र आपल्या ज्ञानाचा फायदा विध्वंसक गोष्टीसाठी फॅरेडेने होऊ दिला नाही..त्याने सरकारला स्पष्ट नकार कळवला. 

लक्षात घ्या.. देशातील सर्वात महत्त्वाचा व्यक्ती म्हणून त्याचा सर्व खर्च, त्याचे वैद्यकीय उपचार इत्यादी सर्व बाबीवर सरकारकडून खर्च होत असून देखील तो सरकारला नाही म्हणू शकला… आपल्याकडे त्याला लगेच देशद्रोही ठरवून पाकिस्तानला पाठवले असते. मात्र फॅरेडेचा मान कायम राहिला. २५ ऑगस्ट १८६७ रोजी जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याचे शव इंग्लंडमधील प्रसिद्ध वेस्टमिन्स्टर अबे मध्ये दफन करायची तयारी सरकार ने दाखवली. मात्र फॅरेडेच्या इच्छे नुसार न्यूटनच्या थडग्याजवळ त्याच्या शवाचं दफन करण्यात आलं.

No comments:

Post a Comment

एक शतक अर्धं संपलं...आणि तरीही त्या दोन शब्दांची थरथर आजही तशीच आहे. तत्कालीन परिस्थितीत असे काहीक घोषणा आणि गीत होते. जी केवळ शब्दांचा संग्...