टोंगा देशाची सहा अल्पवयीन मुलं एका निर्जन बेटावर अडकली तेंव्हा काय झालं?
अनेक कादंबर्या, सिनेमांमधून आपण पाहतो की एखाद्या निर्जन बेटावर काही लोक अडकतात. मग ते कसे आपआपसात भांडून, प्रसंगी एकमेकांना मारुन, त्यांचे मांस खाऊन जगतात वगैरे वगैरे.... ही पाश्चात्त्य साहित्यिकांची-कलाकारांची काय फँटसी आहे माहिती नाही. पण या फँटसीला रिअल लाइफ सिचुएशनमध्ये आणल्यावर नक्की काय घडतं हे दाखवणारे एक उदाहरण प्रत्यक्षात घडले होते.
पृथ्वीच्या नकाशावर शोधून सुद्धा सापडणार नाही असा देश आहे - टोंगा. लहानमोठ्या अशा १६९ समुद्री बेटांचा हा देश ऑस्ट्रेलियापासून जवळ आहे. पण त्यातल्या फक्त ३६ बेटांवर मानवी वस्ती आहे. या देशाची एकूण लोकसंख्या आत्ताच्या घडीला फक्त लाखभर आहे. या देशातल्या बेटांचे एकूण जमीनी क्षेत्रफळ ७५० चौरस-किलोमिटर आहे जे सुमारे सात लाख चौरस किलोमिटर क्षेत्रफळाच्या समुद्रात विखुरलेले आहे. (म्हणजे जवळपास आपला अर्धा भारत) हे सगळे डिटेल्स द्यायचं कारण म्हणजे या देशाबद्दल तुम्ही कदाचित कधीच ऐकले नसेल. त्यामुळे घटनेच्या पार्श्वभूमीचा अंदाज यायला थोडी माहिती तर हवीच.
तर अशा देशामध्ये आधीच लोकसंख्या कमी, त्यातही फक्त ३६ बेटांवर वस्ती, त्यामुळे इतर सर्व बेटे निर्जन-निर्वस्ती.... आणि मी ज्या घटनेबद्दल सांगणार आहे ती आहे १९६५ सालची... सो आप अब हिसाब लगा लो...
तर झालं काय की १९६५ च्या जून महिन्यात, कॅथलिक बोर्डींग स्कूलमध्ये शिकत असलेल्या सहा मुलांना तिथल्या कठोर शिस्तीचा भयंकर कंटाळा आला आणि त्यांनी एकत्र येऊन तिथून पळून ५०० मैलांवर असलेल्या फिजी देशाला जाण्याचा प्लान आखला. प्लान तर भन्नाट होता पण एकच अडचण होती, त्यांच्यापैकी कुणाकडेच बोट नव्हती. कशी असेल, १३ ते १६ वर्षे वयातली लहान मुलं होती ती.
मग त्यांनी एका मासेमार्याची बोट पळवून न्यायचे ठरवले. हा माणूस त्यांच्या फार डोक्यात जायचा. त्याला धडा शिकवायचं कितीतरी दिवसांपासून त्यांच्या मनात होतंच... या पोरांकडे प्रवासाच्या तयारीला अजिबात वेळ नव्हता. कसा असेल? पिकनिक किंवा ट्रेलवर नव्हते जात ते... त्यामुळे थोडीशी केळी, शहाळी आणि एक छोटा गॅसबर्नर घेऊन निघाले. ना नकाशा ना होकायंत्र.
रात्रीच्या अंधारात किनार्यावरुन बोट लंपास होतांना कोणाच्याही लक्षात आले नाही.
सगळं सुरळीत प्लाननुसार पार पडत होते. पण जशी रात्र वाढत गेली तशी पोरं पेंगुळायला लागली आणि दिवसभराच्या मेहनतीने, भावनांच्या हल्लकल्लोळाने दमून गाढ झोपी गेली. बहुतेक त्यांना दुसर्या दिवशीच जाग आली. तेव्हा त्यांची बोट लाटांचे तडाखे खात होती. त्यांनी शिड उभारायचा प्रयत्न केला पण वार्यासमोर ते काही टिकलं नाही. अशाच अवस्थेत सुमारे आठ दिवस ते उघड्या प्रचंड पसरलेल्या पॅसिफिक सागरात लाटांच्या मर्जीवर हिंदकाळत तरंगत भरकटत राहीले. ना अन्न होते ना पाणी. पावसाचे पाणी शहाळ्याच्या वाटीत गोळा करुन पुरवून पुरवून एकमेकांना वाटून प्यायचे. मासे पकडायचे जमले तर...
सरतेशेवटी एकदिवस क्षितिजावर त्यांना आशा दिसली. एक बेट दिसले, नारळाच्या झावळ्या, चमचमता सोनेरी किनारा आणि आकाशात हजार फूट उंच घुसलेला खडकाळ डोंगर. ते होते 'अता' नावाचे एक बेट. टोंगन भाषेत याचा अर्थ आहे - 'पहाट'... या मुलांच्या काळरातीला संपवणारी पहाट उजाडली आणि ही मुलं फक्त ४५० एकर क्षेत्रफळ असलेल्या या छोट्याशा बेटावर उतरले.
इतर अनेक बेटांप्रमाणे हेसुद्धा ठार निर्जन होते. इथली मनुष्यवस्ती शंभर वर्षांपूर्वीच इथून निघून गेली होती. परंतु ट्रॉपिकल आयलंड असल्याने झाडेझुडपे, वनस्पती म्हणजे जिवंत निसर्ग होताच.
इथं आपल्या सहा मुलांनी तळ ठोकला. आपलं प्रत्येक दिवसाचं रुटीन सेट केलं. दोन दोन जणांच्या टीम्स तयार करुन काम वाटून घेतली. स्वयंपाक, शेती आणि राखणदारी अशी कामे आळीपाळीने करु लागली. अशात त्यांची भांडणं व्हायचीत, पण समजून घेऊन मिटवून टाकत. त्यांचा दिवस सुरु व्हायचा प्रार्थनांनी आणि मावळायचा गाण्याबजावण्याने. एकाने नारळाची कवटी आणि बोटीतल्या तारा काढून एक कामचलाऊ गिटार तयार केली होती.
असेच एक दिवस तिथल्या उंच डोंगरावर चढून गेल्यावर तिथे त्यांना मृत ज्वालामुखीचं तोंड दिसलं. आणि तिथे फुलवलेल्या केळीच्या बागा, कोंबड्या आणि वाइल्ड टारो (एक वनस्पती जिचे सगळे भाग अन्न म्हणुन वापरले जातात) सापडल्या... ज्या शंभर वर्षांपूर्वी सोडून गेलेल्या लोकांनी वाढवलेल्या होत्या. त्या आता जंगली कायद्यामुळे सुसाट वाढलेल्या होत्या. बर्यापैकी अन्नाची सोय झाली. सोबतच त्यांनी मासे पकडण्याची सुद्धा सोय केली.
हळू हळू त्यांनी बेटावरील आपल्या जगण्याला आकार द्यायला सुरुवात केली. एवढ्या लहान वयातल्या मुलांनी काय केलं असेल? तर राहती जागा तयार केली, एक किचन गार्डन तयार केलं जिथे ते स्वतःसाठी अन्न पिकवत. झाडांच्या बुंध्यांत पावसाचं पाणी साठवण्याची सोय केली. चित्रविचित्र वजनं असलेली एक जिम तयार केली. एक बॅडमिंटन कोर्ट केला. कोंबड्या राखायला खुराडं केलं आणि अखंड पेटतं अग्निकुंड राखलं. हे सगळं त्यांनी नुसत्या हातांनी, एक जुनाट चाकू व प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर निर्माण केलं. आणि हे सर्व करणारी १३ ते १६ वर्षाची सहा मुलं.
अर्थात हे सगळं आता वाचतांना परिकथा, गोग्गोड वाटतंय पण ते प्रत्यक्षात प्रचंड खडतर जीवन होतं. उन्हाळ्यात पाऊस कमी पडत असल्याने पिण्याच्या पाण्याची बोंब होती. ते कोंबड्यांचं-समुद्रीपक्षांचं रक्त पिऊन, त्या पक्षांची अंडी खाऊन, नारळपाणी पिऊन दिवस कसेबसे ढकलत होते. याला कंटाळून त्यांनी बेटावरुन निघण्यासाठी मचवा/तराफा बांधण्याचा प्रयत्न केला. पण समुद्रात टाकताच त्याचे तुकडे होऊन ते वाहून गेलं.
तशातच त्यातल्या एका मुलाचे उंचावरुन घसरुन पडल्याने पायाचे हाड मोडले. मग त्याला इतरांनी उचलून वर आणले. काठ्या-बांबू वापरुन त्याची शुश्रुषा केली. त्याचे काम इतरांनी वाटून घेतले.
अशा परिस्थितीत या मुलांनी या निर्जन बेटावर एकूण पंधरा महिने जीवंत राहून काढले.
१९६६ च्या हिवाळ्यात एका ऑस्ट्रेलियन मासेमार्याची बोट या बेटाजवळून जात होती. तो मासेमार टोंगा भागातल्या आपल्या मासेमारीच्या मोहीमेवरुन परत ऑस्ट्रेलियाला जात होता. त्याने जाता जाता म्हणून सहजच नेहमीच रस्ता सोडून भलत्या रस्त्याने रमत गमत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याला विशाल समुद्रात हे एकलकोंडे बेट लागले... दुर्बिण लावून त्याने पाहीले तर तिथल्या खडकाळ जमीनीवर आगीच्या खुणा दिसत होत्या. सातत्याचा पाऊस असलेल्या हिरव्यागार रान असलेल्या इथल्या बेटांवर आगी लागण्याच्या घटना नसतात म्हणून याला आश्चर्य वाटत होते. तोच दगडांमागून एक डोक्याचे केस खांद्यापर्यंत वाढलेला मुलगा समोर आला. त्याने लगेच समुद्रात उडी मारली व पोहत पोहत याच्या बोटीजवळ आला. अस्खलित इंग्लिशमध्ये त्याला सांगितले , की आम्ही एकूण सहा मुलं असून गेल्या पंधरा महिन्यांपासून इथं अडकून पडलो आहोत. आम्ही बोर्डींग स्कूलचे विद्यार्थी आहोत, बोर्डींगचं जेवण आवडत नसल्याने पळून निघालो होतो.
ताबडतोब बाकीची मुलेही बोटीवर घेतली गेली. त्यांना त्यांच्या देशात सोडण्यात आले. तिथे त्या मुलांचे स्वागत करायला अख्खा देश गोळा झाला. मोठा उत्सव झाला. कारण त्यांच्यासाठी हा चमत्कार होता. दिड वर्षापूर्वी ही मुलं मेली असावीत असं समजून त्यांचे अंत्यसंस्कार सुद्धा झाले होते.
डॉक्टरांनी जेंव्हा सर्व मुलांची वैद्यकिय तपासणी केली तेव्हा ते त्यांच्या वयाच्या मानाने खूप तंदुरुस्त आणि धष्टपुष्ट होते. बेटावरील मुबलक प्रमाणात मिळालेल्या प्रथिनसंपृक्त आहाराने (हाय-प्रोटीन डायट) त्यांचे स्नायू बळकट व पिळदार झाले होते. ज्या मुलाचा पाय मोडला होता त्याचीही रिकव्हरी आश्चर्यकारकरित्या उत्तम होती.
या सत्यघटनेवरुन मानवी नातेसंबंधांबद्दल आपण काय निष्कर्ष काढू शकतो? दुष्कर जीवघेण्या परिस्थितीत माणसे एकमेकांना सांभाळून घेतात. एकमेकांच्या साथीने टिकून राहतात. एकमेकांना जगवण्याच प्रयत्न करतात. ही आपल्यातल्या आदीम मानवी बाजूची एक ओळख आहे.
अर्थात माणसे हिंस्त्र, आपमतलबी, कटकारस्थानी अशीही असतात. परंतु टोंगा देशातल्या या सहा अल्पवयीन मुलांनी सर्वच मानवजातीला आपल्या आतच दडलेल्या एका आशादायक सत्याची ओळख करुन दिली आहे असे मला म्हणावेसे वाटते.
- लेखकः संदिप डांगे.
#Real_Life_Lessons
No comments:
Post a Comment